Mumbai News: महाराष्ट्रातील गेल्या तीन-पाच वर्षांपासून रखडलेल्या बहुचर्चित 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी (ता.4 नोव्हेंबर) ही घोषणा केली. पण यावेळी राज्य निवडणूक आयोगानं विरोधकांच्या सर्व मागण्या फेटाळून लावत अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे बोट दाखवत निवडणूक नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाविकास आघाडी ठाकरे (Mahavikas Aaghadi) बंधूंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांमधील मतदान प्रक्रियेवरच संशय व्यक्त करत गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात मोहीम उघडली.यात मतदारयाद्यांमधील घोळ आणि मतचोरीचा मुद्दा पुढे करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शकपणे पार पडल्या पाहिजे अशी मागणी विरोधकांनी उचलून धरली आहे. राज्य निवडणूक आयोग आयुक्तांची भेट घेत तसेच मुंबईत सत्याचा मोर्चा काढत महाविकास आघाडी आणि राज व उद्धव या ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राचं राजकारण तापवलं आहे.
विरोधकांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) पारदर्शकपणे पार पडल्या पाहिजे, तरच लोकशाही जिवंत राहिल अशी हाक दिली आहे. तसेच मतदान याद्यांमध्ये हजारो दुबार मतदारांची नावे आहेत. मतदानयादी आधी पारदर्शक करा आणि नंतर मतदान घ्या अशी जोरदार मागणी केली होती. मात्र, तरीसुद्धा राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे की, मतदारयादीत बदल करण्याचा अधिकार आयोगाला नाही. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारयादीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाईल. 1 जुलै 2025 या अधिसूचित केलेल्या तारखेला अस्तित्वात असलेली विधानसभा मतदारसंघांची मतदारयादी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणार असल्याचं राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.याबाबत 15 ऑक्टोबरपर्यंतच्या मतदारयाद्यांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं काही निर्णय आलाच,तर त्याबाबत विचार करण्यात येईल,असंही आयोगानं म्हटलं आहे.
निवडणूक आयोगानं दुबार मतदारासमोर डबल स्टार आलं आणि त्यानं रिस्पॉन्स दिला नाही तर त्या मतदाराकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल. कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान केलं नाही असं लिहून घेतलं जाईल. या मतदान केंद्रानंतर दुसरीकडे मतदान करणार नाही असं त्याच्याकडून लिहून घेतलं जाईल असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. दुबार मतदारांची वेगळी नोंद केलेली असणार आहे. त्यामुळे दुबार मतदारांना त्यांच्या मतदारसंघात मतदान करता येणार आहे, असे राज्य निवडूक आयोगाने म्हटले आहे.
मतचोरीचा मुद्दा तापत असतानाच, महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे, या दोघाबंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाल्या.ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढून, आता कौटुंबिक वातावरण निर्माण झालं आहे. यातच दोघा बंधूंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुंबईसाठी एकत्र येण्याचे संकेत दिले.
अशातच या दोन्ही बंधूंसह महाविकास आघाडीकडून मतचोरी आणि मतदारयाद्यांमधील घोळांविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला होता. एकूणच काय तर 1 जुलै 2025 हीच मतदारयादीसाठीची कट ऑफ डेट असणार आहे. राज्य निवडणूक आयोगावर विरोधकांच्या दबावाचा, आंदोलनाचा कुठलाही परिणाम झालेला नाही हे यातून आता स्पष्ट झालं आहे.
आगामी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदारयादीनुसार राज्यात एकूण 1,07,03,576 मतदार आहेत. या मतदारांमध्ये 53,79,931 पुरुष मतदार, 53,22,870 महिला मतदार आणि 775 पारलिंगी मतदारांचा समावेश आहे. या सर्व मतदारांसाठी एकूण 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यांची केंद्रनिहाय मतदार यादी 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.