Mahavikas Aghadi - Mahayuti Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 News : दिग्गजांच्या शब्दाचंही वजन पडेना, जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; 'या' 12 जागांवरील घोळ कायम!

Political News : राज्यातील 48 पैकी 12 लोकसभा मतदारसंघातील चित्र अद्याप अस्पष्टच आहेत. यामध्ये महायुतीच्या 9 जागांवरील तर महाविकास आघाडीच्या तीन जागांवरील उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही.

Sachin Waghmare

Election News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन जवळपास 26 दिवसांचा कालावधी लोटला आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. जवळपास राज्यातील 48 पैकी 12 लोकसभा मतदारसंघातील चित्र अद्याप अस्पष्टच आहेत. यामध्ये महायुतीच्या 9 जागांवरील तर महाविकास आघाडीच्या तीन जागांवरील उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही.

लोकसभेसाठी तिसरा टप्प्यातील निवडणुकीसाठी 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत तर मतदान 7 मे ला होणार आहे. त्यामध्ये राज्यातील धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, हातकणंगले, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बारामती या लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. येत्या आठ दिवसांत महाविकास आघाडीला (MVA) माढा येथील तर महायुतीला (Mahayuti) सातारा व रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथील उमेदवारांची घोषणा करावी लागणार आहे. (Lok Sabha Election 2024 News)

जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

लोकसभा निवडणुकीचे जागावाटप गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने जवळपास राज्यातील 48 पैकी 12 लोकसभा मतदारसंघातील चित्र अद्याप अस्पष्टच आहे. याठिकाणाच्या जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने उमेदवारांची घोषणा करण्यास विलंब होत आहे.

गुढीपाडव्याचा मुहूर्तावर महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाल्याने तिढा सुटला आहे. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सर्वाधिक 21 जागा मिळाल्या आहेत तर दुसरीकडे काँग्रेसला 17 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला 10 जागा आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसने धुळे, जालना येथील उमेदवारांची घोषणा बुधवारी केली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माढा तर काँग्रेसने उत्तर मुंबई, मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेली नाहीत.

दुसरीकडे महायुतीने (Mahayuti) जवळपास 9 जागांवरील उमेदवार अद्याप घोषित केलेले नाहीत. त्यामुळे या जागांवरील जागावाटपाचा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेषतः काही जागांवर महायुतीमधील दोन-तीन पक्षाने एकाच जागेवर दावा केला असल्याने या जागांवरील उमेदवार फायनल झाले नाहीत.

या जागेवरील महायुतीचे उमेदवार ठरले नाहीत

महायुतीकडून सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पालघर, ठाणे, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मध्य मुंबई, दक्षिण मुंबई येथील उमेदवार अद्याप जाहीर केले नाहीत. या जागांवरून महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात काही जागांवरून वाद असल्याने काही ठिकाणचे उमेदवार ठरले नसल्याने घोषणा बाकी आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

SCROLL FOR NEXT