Tukaram Mundhe sarkarnama
महाराष्ट्र

FDA : तुकाराम मुंढेंच्या कारवाईला आणखी वेग येणार; कोकण विभागासाठी अत्याधुनिक तपासणी प्रयोगशाळा

FDA Konkan Region : मंजुरीनंतर प्रत्यक्ष उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या सचिवपदाचा कारभार तुकाराम मुंढे यांनी घेतल्यानंतर या कामाला वेग आला आहे

Roshan More

.FDA News : कोकण विभागातील भेसळयुक्त अन्नपदार्थावर अधिक वेगाने कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून पेण येथे अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांसाठी ही प्रयोगशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे संशयित नमुन्यांची तपासणी कमी वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांविरोधातील कारवाईला अधिक गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

पेण शहरातील भक्तीनगर परिसरात या प्रयोगशाळेसाठी ३१ गुंठे जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. ही जागा मोक्याच्या ठिकाणी असून, प्रयोगशाळेचा आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरीनंतर प्रत्यक्ष उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या सचिवपदाचा कारभार तुकाराम मुंढे यांनी घेतल्यानंतर या कामाला वेग आला आहे.

कोकण विभागातील वाढती लोकसंख्या, अन्नपदार्थांची मोठ्या प्रमाणावर होणारी विक्री आणि भेसळीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून वेगवेगळ्या दुकानांवर धाडी टाकल्या जात असल्याने सध्या हा विभाग चर्चेत आला आहे.

अहवालास विलंब

सध्या कोकण विभागातून संकलित होणारे अन्न, औषधे आणि इतर उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी मुंबई, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळांकडे पाठविले जातात. कोकण विभागातून राज्यात सर्वाधिक नमुने गोळा होत असल्याने या प्रयोगशाळांवर अतिरिक्त ताण निर्माण होतो. तसेच नमुने दूरवर पाठवावे लागत असल्याने त्यांचे अहवाल मिळण्यास विलंब होतो.

औषधांचीही तपासणी

खाद्यपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, औषधांची शुद्धता, सौंदर्यप्रसाधनांची सुरक्षितता तसेच जीवनसत्त्वे आणि इतर घटकांची अचूकता पडताळून पाहिली जाते. अन्नातील भेसळ रोखणे, निकृष्ट दर्जाच्या किंवा बनावट औषधांचा पुरवठा थांबवणे आणि ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे.

यंत्रणा अधिक सक्षम

पेण येथे उभारण्यात येणारी नवीन प्रयोगशाळा कोकणातील जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी मोठी सुविधा ठरणार असून, अन्न व औषध सुरक्षेच्या यंत्रणेला अधिक सक्षम बनविण्यात भूमिका राहणार आहे. यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि भेसळमुक्त उत्पादने उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना नवी ताकद मिळणार आहे

मुंढेंनी पदभार स्वीकारल्यानंतर कामाला वेग

रायगडचे अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांनी सांगितले की, प्रयोगशाळांमध्ये अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार नमुन्यांची रासायनिक तसेच सूक्ष्मजैविक तपासणी वेग वाढवण्यासाठी ही कोकणच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रयोगशाळा उभारली जात आहे. आवश्यक जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या कामाला वेग आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT