Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मनमोहन सिंग यांचे ‘ते’ दोन फोटो दाखवत फडणवीस संतापले; म्हणाले, प्रश्न गहन आहे...

Rajanand More

Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणरायाची आरती केली. त्यावरून शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांसह काही नेत्यांनी टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दोन फोटो दाखवर विरोधकांवर पलटवार केला आहे.

फडणवीस यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचा संदर्भ दिला आहे. या पार्टीमध्ये तत्कालीन सरन्यायाधीशही उपस्थित होते. 2009 मध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानीही या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

काय म्हणतात फडणवीस?  

गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. काल तर गौरी-गणपतीतील महालक्ष्मीपूजन सुद्धा होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे काल पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले. फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले तर इतका गहजब का, असा सवाल फडणवीसांनी केला आहे.

हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? प्रश्न गहन आहे... हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा, गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा अपमान नाही का, असा सवाल करत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते राऊत?

सरन्यायाधीश आणि पंतप्रधान, हे संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून आहे का? याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे, असे राऊत म्हणाले आहेत. पंतप्रधानांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश मग ते कोणीही असो की महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई लढतोय त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही, तारखांवर तारखा का पडत आहेत. याबाबत आमच्या मनात आता शंका असल्याचे राऊत म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT