Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंकला जोडणाऱ्या पुलाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (ता.12सप्टेंबर) पार पडला. या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा हे नेते उपस्थित होते. उद्धाटन सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी रोडची पाहणी केली. यावेळी दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला.
तर कोस्टल रोडची सफर करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गाडी चालवत होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या शेजारी बसले होते. मात्र या गाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हते. मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंकला जोडणाऱ्या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याला महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित नव्हते. तर दादांची ही अनुपस्थिती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे महायुतीच्या विविध कार्यक्रमांपासून लांब राहत असल्याची चर्चा आहे. तर भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले होते तेव्हा देखील अजितदादा हजर नव्हते. शहांची भेट त्यांनी जाता जाता विमानतळावर घेतली होती.
मात्र, त्याआधीच्या कार्यक्रमात ते दिसले नव्हते. अशातच आता महायुतीसाठी महत्वाचा असणाऱ्या बहुचर्चित अशा कोस्टल रोडच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असताना अजितदादा गैरहजर का राहिले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या पुलाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल असा विश्वास व्यक्त केला. तसंच या प्रकल्पामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल असंही ते म्हणाले.
दरम्यान, हा रोड पूर्ण झाला याचं मनापासून समाधान असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोस्टल रोडबाबत 25 वर्ष फक्त चर्चा व्हायची. देशात आणि राज्यात काँग्रेस सरकार होतं. मुख्यमंत्री दिल्लीला जायचे आणि हात हालवत मागे यायचे, पण मोदी सरकार आल्यानंतर मी स्वत: पुढाकार घेतला हे काम मार्गी लावण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे हे महायुतीच्या सरकारनेच पूर्ण केला आहे आणि या कामाचं श्रेय देखील महायुतीचं असल्याचं ते यावेळी म्हणाले.
अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील चाकण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी ते उपस्थित होते. तसंच त्यांनी आळंदी, खेड आणि चाकण येथे 536 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.