Mumbai news : राज्यात लवकरच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे स्वागताची जय्यत तयारी विविध मंडळाकडून केली जात आहे. त्यातच आता गेल्या काही दिवसापासून पुण्यातील सजग नागरिक विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवात वाजविण्यात येणाऱ्या डीजेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुण्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच दुसरीकडे नागपुरात गणेशोत्सवाच्या काळात डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी धाराशिवमध्ये डीजेबाबत बोलताना मोठे विधान केले आहे. माझ्या सख्या चुलत भावाचा गेल्यावर्षी गणपतीत डीजेच्या आवाजामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगत डीजेच्या बाबतीत काही मर्यादा घालायला हव्यात, असे मत व्यक्त केले आहे. त्यानंतर आता डीजे बंदीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे.
पुण्यातील विद्यानंद बापटांनी सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे आणि लाऊडस्पीकर नसावेत अशी भूमिका सर्वात आधी मांडली होती. त्यानंतर त्यावर सीएम फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुणेकर सांस्कृतिक पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यातील डीजेबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडे लक्ष लागले असतानाच आता मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या भूमिका पुढे येत आहेत.
डीजे बंदीमुळे काही जणांना वाईट वाटत असेल तर वाटू द्या. लहान बालके, वयोवृद्ध नागरिक, आजारी लोकांना डीजेचा त्रास होतो. त्यामुळेच लहान मुले मिरवणुकीत येत नाहीत. त्यामुळे त्यांना इच्छा असूनही मिरवणुकीला येता येत नाही. ज्या-ज्या ठिकाणावरुन मिरवणूक जाते. तेथील नागरिकांना त्याचा त्रास असतो, हे आपण नाकारु शकत नाही,” असे मत सामाजिक व न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखती प्रसंगी व्यक्त केले.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील डीजेच्या वादात उडी घेतली आहे. डीजेच्या बंदीवरून त्यांनी सीएम फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पुण्यातील डीजेच्या वादावर मुख्यमंत्री नेमके काय बोलले आहेत मला आजपर्यंत काही कळलेले नाही. ते म्हणतात की, कायद्याने आम्हाला काही करता येत नाही. तर मग नागपुरमध्ये डीजे कसा बंद झाला? नागपूरसाठी वेगळा नियम आणि पुण्यासाठी वेगळा नियम, कसा काय अशी रोखठोक भूमिका राज ठाकरे यांनी यावेळी मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.