Goa BJP minister corruption Sarkarnama
महाराष्ट्र

Goa Government: गोवा भाजप सरकारमध्ये मोठा भूकंप; CM सावंतांचा मंत्री गावडेंना मंत्रिमंडळातून तडकाफडकी डच्चू

Pramod Sawant Government: 'गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पक्षाच्या समन्वयाने घेतला आहे. कोणाशीही मित्रत्व तसेच, शत्रुत्वही आम्हाला नको आहे," अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी गावडे यांच्या गच्छंतीनंतर दिली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Goa News : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर टीका करणाऱ्या कला आणि संस्कृती तसेच क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून अखेर हटविण्यात आले आहे. गावडे यांना मंत्रिपदावरुन हटविण्याबाबत दिल्लीत निर्णय घेण्यात आल्यानंतर बुधवारी (ता.18 जून) अखेर त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मंत्री गावडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी कारवाईचा इशारा दिला होता.

कला, संस्कृती आणि क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमातून आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर टीका केली. पैसे घेऊन कामाच्या फाईल मंजूर केल्या जातात, असा आरोप गावडे यांनी केला होता. तसेच, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हे खाते सांभाळण्याबाबतच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

गावडे यांच्या या वक्तव्याचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी गंभीर दखल घेत योग्य कारवाई करण्याचा इशारा दिला होता. गोव्याचे (Goa) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील कारवाईबाबत सकारात्मकता दर्शवली होती. गावडेंच्या वक्तव्याची दिल्लीत देखील माहिती देण्यात आली होती.

दामू नाईक यांनी दिल्लीला पक्ष नेतृत्वाची भेट घेऊन गावडेंच्या वक्तव्याची माहिती दिली. नाईक यांनी दोनवेळा दिल्ली दौरा केला. यात प्रामुख्याने राज्यातील मंत्रिमंडळाचा फेरबदल आणि गोविंद गावडे यांच्या कारनाम्यांवर चर्चा झाली होती. गावडे यांच्या गच्छंतीचा निर्णय दिल्लीत निश्चित करण्यात आला होता. अखेर याबाबत बुधवारी निर्णय घेण्यात आला व गावडेंना मंत्रिपदावरुन हटविण्यात आले.

'गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पक्षाच्या समन्वयाने घेतला आहे. कोणाशीही मित्रत्व तसेच, शत्रुत्वही आम्हाला नको आहे," अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी गावडे यांच्या गच्छंतीनंतर दिली आहे. तसेच, "पक्षवाढीसाठी येत्या आठ दिवसांत अनेक निर्णय घेतले जाणार आहेत,' असे दामू नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

कला अकादमीच्या नूतनीकरणातील भ्रष्टाचार, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यातील कथित भ्रष्टाचार अशा विविध प्रकरणात गोविंद गावडे यापूर्वी वादात सापडले आहेत. त्यानंतर प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी थेट मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्यातील कारभारावर टीका केली अन् त्यांची गच्छंती अटळ मानली जाऊ लागली. अखेर केंद्राकडून ग्रीन सिग्नल आल्यानंतर राज्य नेतृत्वाने गावडेंना मंत्रिपदावरुन हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT