Rahul Gandhi Sarkarnama
महाराष्ट्र

Gokul Controversy : 'दयनीय अवस्था!' गोकुळच्या निवडणुकीवरुन फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार; म्हणाले, 'केवळ साडेचार हजार मतदारांच्या निवडणुकीतही...'

Devendra Fadnavis Reply To Rahul Gandhi Over Gokul Tweet : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या आणि त्यावरील शासननियुक्त संचालकांच्या वादावरून आता गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Aslam Shanedivan

Nagpur News : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच निर्माण झाला असून, नव्या वादाला तोंड फुटले आहे. अध्यक्ष निवडीचा प्रश्न उच्च न्यायालयात गेला असतानाच महायुती सरकारने पाच शासननियुक्त सदस्यांचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी चार सदस्यांना मतदानाचा अधिकार दिल्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत संतापाची लाट उसळली आहे. गोकुळच्या मुद्द्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट केल्यानंतर भाजपनेही यावर पलटवार केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या पोस्टवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. नागपूर येथे बोलताना त्यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला २५ पैकी १३ जागा मिळाल्या होत्या, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या आहेत. समविचारी आघाडीला काठावर बहुमत मिळाले असून, महायुतीला सत्ता स्थापनेसाठी आणखी दोन संचालकांची गरज आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडीचा मोठा पेच निर्माण झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच संचालकांच्या नियुक्तीसह त्यापैकी चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे राजकीय वादाला तोंड फुटले असून, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. अशातच शिंदेंची शिवसेनाही या निर्णयावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल करणारे ट्विट केले. हा दूध उत्पादकांच्या मतांवर पडलेला दरोडा असून, जनमतातील भेसळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजप कुठल्याही थराला जात असून, शेतकरी हा प्रकार कधीही विसरणार नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला.

यामुळे आता गोकुळच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना राहुल गांधींच्या ट्विटवरून खोचक शब्दांत निशाणा साधला. तसेच, गोकुळमध्ये संचालक नियुक्त केले नसते, तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती, असेही त्यांनी म्हटले. काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गोकुळच्या निवडणुकीवर ट्विट करून हा प्रकार मतचोरी असल्याचे म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, "राहुल गांधींची अवस्था किती दयनीय झाली आहे! गोकुळमध्ये केवळ ४,५०० मतदार आहेत आणि त्यासाठी राहुल गांधींना दिल्लीत बसून ट्विट करावे लागत आहे."

‘गोकुळ’वर संचालक नेमले नसते, तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती, असेही त्यांनी सांगितले. १३ जागा जिंकूनही कोरम पूर्ण होत नाही. त्यामुळे अध्यक्ष निवडता येत नाही. अध्यक्ष निवडण्यासाठी किमान १४ सदस्यांची गरज आहे. त्यामुळे कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. अध्यक्ष निवडीसाठी एक बैठक झाली; परंतु बैठकीसाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने ती रद्द करावी लागली. आणखी एक-दोन बैठका घेतल्या असत्या आणि त्यातही संख्याबळ नसते, तर ही निवडणूकच रद्द झाली असती. म्हणून सरकारने चार सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेतला, असे फडणवीस यांनी सांगितले.

काही जण म्हणतात की, हा निर्णय टिकणार नाही. मात्र, आम्ही अॅडव्होकेट जनरल यांचे मत विचारात घेऊनच हा निर्णय घेतला आहे, असे नमूद करत त्यांनी, "कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय टिकतो की नाही, ते पाहू. हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही. तरीही राहुल गांधी यातही हस्तक्षेप करत आहेत," असा टोला लगावला. दरम्यान, कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून आणि त्यावरील शासननियुक्त संचालकांच्या निर्णयावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार वाक्युद्ध रंगले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT