Jan Suvidha Yojana: ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या "ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान" या योजनेतील कामांची व्याप्ती आता वाढवण्यात आली आहे.
या नव्या निर्णयानुसार, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध विकासकामांचा समावेश करण्यात आला असून, यासाठी ठराविक खर्चाची मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामविकास विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी केला आहे.
स्थानिक पातळीवरून होणाऱ्या वाढत्या मागण्यांचा विचार करून शासनाने जन सुविधा योजनेच्या व्याप्तीत नवीन कामांचा समावेश केला आहे. नव्या नियमांनुसार खालील कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे:
जुन्या शाळा आणि अंगणवाड्यांच्या इमारतींची डागडुजी आणि सुशोभिकरणासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध होईल.
विद्यार्थी आणि लहान मुलांसाठी स्वच्छतागृहांचे बांधकाम किंवा दुरुस्ती करण्यासाठी ३ लाख रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित केली आहे.
शाळा आणि अंगणवाड्यांच्या इमारतींमध्ये सोलर पॅनेल बसवणे आणि विजेची जोडणी/विद्युतीकरणासाठी ५ लाख रुपये मंजूर केले जाऊ शकतात.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा आणि अंगणवाडीच्या आवाराला संरक्षक भिंत उभारण्यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) आणि आपत्कालीन सुरक्षेसाठी अग्निशामक यंत्रे बसवण्यासाठी ३ लाख रुपयांपर्यंत निधी वापरता येईल.
हा निर्णय लागू करताना प्रशासनाला विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रस्तावित करण्यात आलेली कामे इतर कोणत्याही योजनेतून किंवा विभागाकडून आधीच मंजूर झालेली नाहीत, याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे.
एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या योजनांमधून निधी घेतला जाऊ नये (द्विरुक्ती होणार नाही), यासाठी कडक सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील यांनी हा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक व मूलभूत सुविधांचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.