

राजगुरूनगर (पुणे) : आरटीईच्या 25 टक्के प्रवेश प्रक्रियेत आपल्या पाल्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी चुकीची माहिती आणि दिशाभूल करणारे रहिवासी पुरावे सादर केल्याचा आरोप खेड तालुक्यातील 14 पालकांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात संबंधित पालकांविरोधात फसवणुकीसह खोटे कागदपत्र सादर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणातील तक्रारीनुसार, मार्च 2026 ते मे 2026 या कालावधीत संबंधित पालकांनी आपल्या मुलांच्या इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी रहिवासी पत्त्याची कागदपत्रे राजगुरूनगर येथील पंचायत समितीच्या तालुका स्तरावरील आरटीई प्रवेश समितीकडे सादर केली होती. या कागदपत्रांच्या आधारे मुलांना आरटीईच्या 25 टक्के कोट्यातून दोन नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला.
यामध्ये आळंदी येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल तसेच आंबेठाण येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल यांचा समावेश आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करताना त्यामध्ये नमूद केलेल्या पत्त्यांवर संबंधित पालक वास्तव्यास नसल्याचे निदर्शनास आल्याचे पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद आहे.
प्रशासनाकडे सादर करण्यात आलेल्या रहिवासी पुराव्यांच्या आधारे आरटीई प्रवेशाचा लाभ घेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित पालकांनी प्रवेश प्रक्रियेची दिशाभूल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
खेडचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून 14 पालकांविरोधात फसवणूक आणि खोटे कागदपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ करीत आहेत. सादर करण्यात आलेली रहिवासी कागदपत्रे, संबंधित पत्ते आणि आरटीई प्रवेश प्रक्रियेतील नोंदी याबाबत तपास केला जात आहे. या तपासातून पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.