Gujrat Politics Sarkarnama
महाराष्ट्र

Gujrat Pattern: गुजरातमधील राजकीय भूकंपाचे महाराष्ट्रात हादरे! स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मंत्र्यांनी घेतलाय धसका

Gujrat Pattern: महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य गुजरातमध्ये नुकताच राजकीय भूकंप झाला. केवळ मुख्यमंत्री सोडून सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले तसंच लगेचच नव्या चेहऱ्यांसह नवं मंत्रीमंडळही स्थापन झालं.

सरकारनामा ब्युरो

Gujrat Pattern: महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य गुजरातमध्ये नुकताच राजकीय भूकंप झाला. केवळ मुख्यमंत्री सोडून सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले तसंच लगेचच नव्या चेहऱ्यांसह नवं मंत्रीमंडळही स्थापन झालं. येत्या दोन तीन महिन्यांत गुजरातमध्ये देखील महाराष्ट्राप्रमाणं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. यापार्श्वभूमीवरच गुजरातमध्ये भाजपनं काम न करणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला आणि अँटिइन्कमबन्सी टाळण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधीही दिली. आता हाच पॅटर्न महाराष्ट्रातही होऊ शकतो, अशी भीती महाराष्ट्रातील नेत्यांनाही वाटत असावी.

महाराष्ट्रातही स्थानिक निवडणुकांपूर्वी घडलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचा पॅटर्न येतो की काय? याची शंका येण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. मुंबई महापालिका तर त्यांच्या प्रथम क्रमांकासाठी टार्गेटवर आहे. त्यातच जिल्हा परिषदा, नगर परिषदा, नगरपंचायती, पंचायत समित्या आणि महापालिका अशा सर्वच निवडणुकांसाठी भाजपच्या मंत्र्यांनाच टार्गेट देण्यात आलं आहे. यासाठी पालकमंत्री आणि जिथं पालकमंत्री नाहीत तिथं संपर्कमंत्री अशा सर्वांवरच भाजपनं या निवडणुकांमध्ये गुलाल उधळण्याची जणू हमीच घेतली आहे. यासाठी विभागवार बैठकांचा धडकाच मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. याच्या दोन फेऱ्याही पूर्ण झाल्यात, येत्या काळात अशा आणखी फेऱ्या होऊ शकतात.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर भाजपला घवघवीत यश मिळालं किंवा यश मिळत असल्याचं दिसून आलं तर अनेकांची मंत्रीपद कायम राहतील अन्यथा मंत्रीमंडळात फेरबदल होऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, असे तर्कवितर्क आता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवले जात आहेत. याचाच अर्थ जे शेजारच्या गुजरात राज्यात निवडणुकीपूर्वीच हे प्रत्यक्षपणे दिसून आलं आहे, तेच महाराष्ट्रातही निवडणुकीपूर्वीच घडू शकतं, याची धास्ती आता भाजपच्या मंत्र्यांना सतावत असणार आहे.

त्यातच अद्याप आपल्याकडं निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण बहुतेक करुन महायुतीतील तिनही पक्ष हे स्वबळावरच स्थानिक पातळीवर निवडणुकीला सामोरं जातील अशी शक्यता वाटू लागली आहे. कारण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना जे वाटेल त्याप्रमाणेच युती किंवा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला जाईल असं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं जर भाजप देखील स्वबळावर लढणार असेल तर विभागांचे मंत्री अन् पालकमंत्र्यांना जिल्ह्याप्रमाणं गुलाल उधळण्याची जबाबदारी देखील निश्चित केली जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT