Gulabrao Patil 

Sarkarnama

महाराष्ट्र

लालू स्टाईल गुलाबरावांच्या अंगलट! आली माफीनाम्याची वेळ

सरकारनामा ब्युरो

जळगाव : शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल २४ तासांच्या आत माफी मागावी लागली आहे. आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या गालासारखे आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावरून ते चांगलेच वादात सापडले होते. राज्य महिला आयोगानेही त्यांच्या या वक्तव्याची दखल घेतली होती. त्यांच्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र यावरुन त्यांनी आता माफीनामा सादर केला आहे.

कधी काळी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव (Lalu prasad yadav) बिहारमधील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे असल्याचे म्हणत होते. मात्र त्यांचीच स्टाईल गुलाबराव पाटील यांनी काल बोदवड नगरपंचायत प्रचार भरसभेत बोलताना कॉपी करण्यचा प्रयत्न केला. ते म्हणाले, "गेली ३० वर्षे या भागातले आमदार आहेत. पण ते साधे रस्ते चांगले करू शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनी यांच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत."

या वक्तव्याची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर गुलाबराव पाटील चांगलेच वादात सापडले होते. या वक्तव्यावरून भाजपचे नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी गुलाबरावांची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी होणार? गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत, पण पोलिस यंत्रणांना यात महिलांचा विनयभंग दिसत नाही, अशी टीका वाघ यांनी केली होती. तसेच तात्काळ गुन्हा दाखल करा, नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही वाघ यांनी दिला होता.

त्यापाठोपाठ राज्य महिला आयोगानेही त्यांच्या या वक्तव्याची दखल घेतली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता. 'एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अशाप्रकारचे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे. एखाद्या गोष्टीची तुलना ही महिलांच्या रंगरुपाशी करणे, हे संस्कार आणि ही संस्कृती अतिशय नीच पातळीची आहे,' आपण महिलांना दुय्यम वागणूक देत आहात, हे चुकीचे आहे. त्यामुळे आपण केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी, अन्यथा आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. असा इशारा चाकणकर यांनी दिला होता.

त्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपला माफीनामा सादर केला आहे. आपल्या फेसबुक पेजवर त्यांनी म्हटले आहे की, चांगले रस्ते असावेत अशी अपेक्षा त्या वक्तव्यामागे होती. परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर आहे, तसेच महिलांविषयीही आपल्या मनात नेहमी आदराचीच भावना होती, आजही आहे आणि यापुढेही राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT