पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यांचा आजचा दुसरा दिवस आहे. या दौऱ्यात आज ते पुण्यात होते. या दरम्यान विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर शहांनी स्वारगेटवरील गणेश कला क्रिडा मंडळ सभागृहात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी २०२४ ला देखील एकटे लढणार आणि स्वबळावर सरकार स्थापन करुन दाखवणार, पुणे हि त्याची सुरुवात असेल, असे म्हणत शिवसेनेला आव्हान दिले.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, अमित शहांना बघितल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांची आठवण येते. जे आसाम कधी काळी हातातून जाईल असे वाटत होते ते तुमच्या बुथ संपर्क या योजनेमुळे २ वेळा जिंकता आले. महाराष्ट्रात देखील दोन वेळा भाजप १०० च्या वर जावू शकला. इतर मात्र जे पंतप्रधान बनण्याचे स्वप्न बघत आहेत ते कधी ६० च्या वर गेले नाहीत, काँग्रेस कधी ७० च्या वर गेले नाहीत. तर ज्या शिवसेनेने आम्हाला धोका दिला, मोदींच्या नावाने मत मागितली ते देखील कधी ७३ च्या वर गेले नाहीत. पण आपण गेलो. आता २०२४ ला देखील एकटे लढणार आणि स्वबळावर सरकार स्थापन करुन दाखवणार, पुणे त्याची सुरुवात असेल, असे म्हणत चंद्रकांतदादांनी शिवसेनेला खुले आव्हान दिले.
प्रदेशाध्यक्ष पाटील पुढे म्हणाले, मध्यंतरी एका मोठ्या वृत्तपत्रांने उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) मोठा फोटो छापला होता. त्यावर लिहिले होते, सरकार तुम कहा गायब हुये? या राज्यात खरंच प्रश्न पडतो कि सरकार आहे कि नाही. कारण या राज्याला नियमित पोलिस महासंचालक नाहीत, नियमित मुख्य सचिव नाहीत. सगळे तात्पुरते आहेत. माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत. जे आहेत ते बोलत नाहीत, असे म्हणत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना लक्ष्य केले. यावेळी पाटील यांनी मोदींना मात्र महाराष्ट्राची काळजी असल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदी (Narendra Modi) चांगली काळजी घेतात. मोदींनी कोरोना काळात प्रत्येक कार्यकर्त्यांची फोन करुन विचारपुस केली. ममता देखील म्हणातात की मोदी २२ तास काम करतात. त्यामुळे अशा पक्षात असल्याचा आपल्याला अभिमान आहे. त्यामुळे हा पक्ष असा मजबूत करुया की आगामी काळात केवळ १२० नगरसेवक आणि ८ आमदार नाही, तर पुणे, मुंबई, नाशिक अशा केंद्रामधून संपुर्ण महाराष्ट्राला ताकद देवू. कसली युती वगैरे नाही. काही गरज नाही त्याची, असेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.