Mla Gulabrao Patil, Jalgaon News Sarkarnama
महाराष्ट्र

Gulabrao Patil : बंड नाही, बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला..

कोरोना काळात एकनाथ शिंदे यांनी सगळ्या आमदार, मंत्र्यांना मतदारसंघात काय हवे नको, ते विचारले. मग अशावेळी आमदार ते लक्षात ठेवणार नाही का ? ( Shivsena)

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे साहेबांसोबत आम्ही गेल्यानंतर आमच्याबद्दल काय बोललं गेलं. गटाराचं पाणी, डुक्कर, वेश्या, गद्दार, बंडखोर. ज्यांना तीन-तीन लाख लोक निवडून देतात त्या लोकप्रतिनिधी बद्दल अशी भाषा. पण ते हे विसरले की याच लोकांची मतं घेऊन तुम्ही खासदार झाला आहात, असा घणाघात शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Snajay Raut) यांचे नाव न घेता केला.

आम्ही बंड केलेले नाही, सामान्य शिवसैनिकाच्या मनात ज्या भावना होत्या, त्यांना जे वाटत होतं ते आम्ही केले. याला तुम्ही बंड म्हणत असाल, पण हे बंड नाही, तर उठाव आहे. (Maharashtra) बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा उठाव आहे, असेही पाटील यांनी ठणकावून सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शिदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत बहुमत सिध्द केले. १६४ विरुद्ध ९९ मतांनी विश्वास मत प्राप्त केल्यानंतर अभिनंदन ठरावावर बोलतांना गुलाबराव पाटील चांगलेच आक्रमक झाले होते.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यापासून जी टीका झाली, त्याला पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले. गुलाबराव पाटील म्हणाले, जे घडले ते एका दिवसात घडलेले नाही. आमदारांमध्ये प्रचंड नाराजी होती, मुख्यमंत्री भेटत नव्हते, मंत्र्यांची, पदाधिकाऱ्यांची, सामान्यांची कामे होत नव्हती, भेट मिळत नव्हती. याबद्दल वीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांना भेटून हे सांगितले. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून ते सांगण्याचा प्रयत्न केला, पण ऐकून घेतलं नाही.

कोरोना काळात एकनाथ शिंदे यांनी सगळ्या आमदार, मंत्र्यांना मतदारसंघात काय हवे नको, ते विचारले. मग अशावेळी आमदार ते लक्षात ठेवणार नाही का ? तुमच्या आजुबाजूला असलेल्या चार कोंबड्यांनी तुम्हाला आमच्यापासून दूर केलं. माझ्या जिल्ह्यातील एक उपजजिल्हाप्रमुख भाजपात जाणार हे कळल्यावर मी दोन दिवस त्याला घेऊन बसलो, त्याचे म्हणणे ऐकून घेतले. पण इकडे दोन-पाच नाही, तर वीस आमदार पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असतांनाही नेते काहीच बोलायला तयार नाही.

मी बोलायला गेलो तर एक नेते मला म्हणाले, तुम्हाला जायचे असेल तर तुम्हीही जा, ही भाषा. दोन-पाच आमदार गेले तर समजू शकतो, पण ४० आमदार जातात याचा अर्थ काय ? याचा विचार तुम्ही कधी करणार की नाही ? असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केला. पक्ष रसातळाला जात असतांना शिवसैनिक कधीच गप्प बसू शकत नाही.

मुख्यमंत्री असतांना पक्ष चौथ्या क्रमांकावर..

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांचा पक्ष नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीत क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. आमचा मुख्यमंत्री असतांना आम्ही नगरपरिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर गेलो. पक्ष संपत असतांना तुम्ही आमदारांच, शिवसैनिकांच ऐकून घेणार नसाल, त्यांना भेटणार नसाल तर आम्ही काय करावं. निवडणुकीत तुम्ही कसे निवडून येता ही यांची भाषा.

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, त्यांनी आमच्या कपाळावर आमदार,खासदार, मंत्री होण्याचे भाग्य लिहले होते. त्यांच्या आणि आनंद दिघे साहेबांच्या आशिर्वादाने आम्ही मंत्री, आमदार झालो. शिवसेनेसाठी आम्ही २५-२५ वर्ष खर्ची केली, अंगावर केसेस घेतल्या. पुन्हा आम्हाला निवडणूकीला सामोरे जावे लागणार आहे. मग आम्हाला भिती नाही का ? पण आम्ही जे केले ते चुकीचे केलेले नाही, शिवसैनिकांच्या मनात जे होते तेच केले. त्यामुळे आता जेव्हा आम्ही मतदारसंघात जाऊ तेव्हा आमचे स्वागत कसे होते ते पहाच, असेही गुलाबराव पाटील यांनी सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT