Haji Arafat shaikh
Haji Arafat shaikh Sarkarnama
महाराष्ट्र

पुणे वक्फ बोर्डातील घोटाळा लपवण्यासाठी मलिकांकडून आरोपांची सर्कस

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : नोटबंदीनंतर मुंबईत साडेचौदा कोटी रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. त्यात भाजप नेते हाजी अराफत शेख यांचा लहान भाऊ इम्रान आलम शेख व आणखी एकाला पकडण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडे फक्त ८ लाख ८० हजार रुपयांच्याच बनावट नोटा सापडल्याचे सांगून त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले असा आरोप राज्याचे मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. यावर पुणे वक्फ बोर्डातील घोटाळा बाहेर येऊ नये म्हणून मलिकांकडून आरोपांची सर्कस सुरु असल्याचे म्हणत हाजी शेख यांनी मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे.

हाजी शेख देहू येथील आपल्या निवासस्थानी बोलत होते. ते म्हणाले, महिना १०० कोटी रुपये हफ्ता वसुलीत लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणखी काही मंत्री व नेते गोत्यात येणार असल्याने आणि पुणे वक्फ बोर्डातील आपला घोटाळा बाहेर येऊ नये त्यामुळे या सगळ्यावरुन लक्ष हटवण्यासाठी मलिक यांची भाजपवर आरोपांची सर्कस सुरु आहे. तसेच मलिक यांच्याविरोधात मुंबईत आणखी पत्रकार परिषद घेवून खुलासा करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे नाही, तर मलिक यांचेच अंडरवर्ल्डशी कसे संबंध आहेत, हे आपण उघड करणार आहे. तसेच डबा, बाटली हे भंगार विकून मलिक यांनी एवढी माया कशी जमा केली. त्यांची किती गोडावून आहेत, किती दुकाने आहेत, किती हॉटेले आहेत, याचा खुलासा आपण करणार आहे. आई-वडिलांची शिकवण आणि देहूसारख्या संतभूमीतील असल्याने महिला व परिवाराविषयी बोलणार नाही. अन्यथा कोणाचा मुलगा रशियन मुलीला घेऊन पळाला, कोणाची मुलगी कोणाबरोबर पळाली, याची सारी खबरबात आपल्याकडे आहे. ते बोललो, तर मलिक हे कॅमेऱ्यासमोरून पळ काढतील, असाही दावा त्यांनी केला.

पोलिसांसह विविध तपास यंत्रणांना ज्या गोष्टी कळत नाहीत, त्या नवाब मलिक यांना कशा कळतात. ते काय 'जिन' आहेत का? तसेच महिना १०० कोटी रुपये हफ्ता वसुलीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणखी काही मंत्री व नेते गोत्यात येणार आहेत. त्यामुळे मलिक यांनी आता शांत बसावे, अन्यथा पुन्हा मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ त्यांच्यावर येईल. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे त्यांना यापूर्वी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, याची आठवणही शेख यांनी करून दिली. हाजी शेख हे सुरुवातीला 'मनसे' त होते. त्यानंतर ३ वर्षापूर्वी ते भाजपमध्ये गेले. त्यावेळी त्यांना अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष करून फडणवीस यांनी राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT