अभिनेत्री कंगना राणावत (Kangna Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. "१९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले होते. खरे स्वातंत्र्य तर २०१४ मध्येच मिळाले" या आपल्या वक्तव्यावरुन कंगना आता वादात सापडली आहे. टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या एका परिषदेत बोलताना तिने हे वक्तव्य केले होते. तिच्या या वक्तव्यावरुन तिला फक्त विरोधी पक्ष काँग्रेसमधूनच (Congress) नाही तर भाजपमधून (BJP) देखील मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. कालच भाजपचे खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी "या विचारांना वेडेपणा म्हणावा की देशद्रोह" असे म्हणत कंगनावर टीका केली आहे.
तसेच अभिनेत्री स्वरा भास्कर, माजी सनदी अधिकारी सुर्यप्रताप सिंह यांनीही तिच्यावर सडकून टिका केली आहे. पण आज जी कंगना १९४७ साली स्वातंत्र्य भीक मागून मिळाले असल्याचे म्हणत आहे, त्याच स्वातंत्र्य लढ्यात कधी काळी तिच्या पुर्वजांचाही समावेश होता. कंगनाचे पणजोबा सर्जू सिंग हे स्वत: स्वातंत्र्य सैनिक होते. याबद्दल एका मुलाखतीमध्ये खुद्द कंगनाने सांगितले होते. गांधीजींच्या एका हाकेला ओ देत त्यांनी ब्रिटिशांची नोकरी सोडून स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता.
सर्जू सिंग हे मुळचे हिमाचल प्रदेशातील राहिवासी. सुरुवातीला आपल्या पोटा-पाण्याचा प्रश्न म्हणून ब्रिटिशांकडे हेड क्लार्क म्हणून नोकरी करायचे. मात्र महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्यात उतरण्यासाठी हाक दिल्यानंतर ते नोकरीवर लाथ मारत स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. चले जाव सारख्या मोठ्या चळवळीत ते अग्रक्रमाने सहभागी होते. तेव्हा गांधीजींनी आपल्या पणजोबांना पत्र लिहिल्याचेही कंगनाने या मुलाखतीमध्ये सांगितले होते.
सर्जू सिंग पुढे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे मोठे नेते बनले. तसेच राजकारणात उतरत त्यांनी हिमाचल प्रदेशमधील पहिल्या विधानसभा निवडणुकीत गोपालपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. सलग दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते.
सर्जू सिंग यांच्यानंतर कंगणाचे आजोबा ब्रम्हचंद राणावत हे सुद्धा पक्के गांधीवादी नेते होते. मात्र ते कधी राजकारणात उतरले नाहीत. त्याऐवजी त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला होता. ६० च्या दशकात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमध्ये पास होत ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. आपल्या सरकारी नोकरीच्या अखेरच्या टप्प्यात ते उद्योग विभागातून वरिष्ठ उपसंचालक म्हणून निवृत्त झाले होते.
आता खुद्द कंगनाचे पुर्वजच स्वातंत्र्य सैनिक होते मात्र तरीही तिचे स्वातंत्र्याबद्दलच्या मतावर सोशल मिडियामधून बरीच टीका केली जात आहे. तसेच तिला मिळालेले सर्व राष्ट्रीय पुरस्कार मागे घेण्यची मागणी होत आहे. महाराष्ट्रातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना या पक्षांनी कंगनाचे पद्मसह राष्ट्रीय पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली आहे. सोबतच तिच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असून, तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. याआधीही तिच्यावर मुंबई पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.