Harshvardhan Sapkal speaking in Pune about MVA strategy and Congress claim over Maharashtra Rajya Sabha seat. Sarkarnama
महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सकपाळ यांनी फिरवला डाव; ठाकरेंना ऑफर देत राज्यसभा खासदारकी आपल्याकडे ठेवण्याचा आखला प्लॅन

Maharashtra Rajya Sabha Election : हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी करत उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत जावे अशी ऑफर दिली. महाविकास आघाडीत जागावाटपावर चर्चा वाढली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीकडे यंदा फक्त एकच जागा जिंकता येईल एवढंच संख्याबळ आहे. सुरुवातीला या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा होती आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांनी राज्यसभेत जावे असे संकेत दिले होते.

मात्र, ठाकरे सेनेचे आमदार आणि नेते आदित्य ठाकरे यांनी याबाबत बोलताना शिवसेना हा मोठा पक्ष असल्याने आणि विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता, ही जागा शिवसेनेच्या वाट्याची आहे. त्यामुळे आघाडीतील जागेसाठी शिवसेनेचाच प्रथम हक्क असल्याचा दावा त्यांनी केला. आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे संजय राऊत यांनी युटर्न घ्यावा लागला आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील एक वेगळाच प्लॅन सांगितला आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राज्यसभेच्या मागील निवडणुकांमध्ये आम्ही तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो होतो. त्यावेळेस आम्हाला चार जागा मिळाल्या होत्या त्यातील दोन जागा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्या होत्या त्यातील एका जागेवरून शरद पवार हे निवडून आले होते. काँग्रेसकडून राजीव सातव हे निवडून आले होते आणि प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेकडून खासदार झाल्या होत्या.

मात्र सध्याची परिस्थिती पाहिल्यास संख्याबळानुसार महाविकास आघाडी म्हणून आमचा एकच सदस्य निवडून जाऊ शकतो. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीनंतर लगेच होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील आमचा एकच आमदार निवडला जाऊ शकतो. मागील वेळेचा विचार केल्यास महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा उद्धव ठाकरे यांचाच असावा म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांची निवड मागील वेळी झाली होती.

मागील वेळी ते महाविकास आघाडीच्या आमदार पदाचे उमेदवार होते. यंदा देखील त्यांनी विधान परिषदेवर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जावं अशी काँग्रेसची इच्छा आहे. तसेच राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराला राज्यसभा खासदार म्हणून संधी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे.

राज्यसभेमध्ये विरोधी पक्षाचे नेते म्हणून मलिकार्जुन खरगे हे आहेत. त्यामुळे त्यांची ताकद वाढवण्यासाठी राज्यसभेमध्ये काँग्रेसचा खासदार असणे आवश्यक आहे. त्यामुळे ठाकरे सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेची खासदारकी काँग्रेसला द्यावी अशी विनंती असणार आहे.

हर्षवर्धन सकपाळ पुढे म्हणाले राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये अजून कुठलीही चर्चा झाली नाही. चर्चा झाल्यानंतर तोडगा निघेल, महाविकास आघाडी म्हणून एकत्रित बसू ,आणि सर्वांना मान्य होईल असे निर्णय घेऊ असं देखील स्पष्टीकरण हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT