Sanjay Raut Vs Tanaji Sawant  Sarkarnama
महाराष्ट्र

Tanaji Sawant : ''माझ्यासाठी तो किरकोळ...'' ; संजय राऊतांच्या आरोपांवर तानाजी सावंतांचं विधान!

Mayur Ratnaparkhe

Health Department News : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या आराेग्य विभागाच्या कामकाजात प्रचंड गोंधळ, भ्रष्टाचार, अनियमितता, बदल्या-बढत्यांसाठी आर्थिक देवाण-घेवाण सुरू असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. शिवाय यासंदर्भातच त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रही पाठवलं आहे. यावर आज राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांनी उत्तर दिलं.

नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना तानाजी सावंत म्हणाले, ''आज मी जी काही उत्तर देतोय, ते एका व्यक्तीने प्रश्न उपस्थित केलेत म्हणून मी देत नाही. कारण ज्या दिवसापासून आरोग्य खात्याचा कारभार मी सांभाळलेला आहे.

त्या दिवसापासून आजपर्यंत महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेचं आरोग्य कशा पद्धतीने सांभाळलं पाहिजे?, आरोग्य विभागात कोणत्या सुधारणा झाल्या पाहिजेत? आरोग्य विभागाने आतापर्यंत घेतलेले वेगवेगळे निर्णय कोणते? आणि ज्या अपेक्षेने महाराष्ट्रातील जनता आरोग्य विभागाकडे बघते आहे, तो विश्वास कुठंतरी तुटता कामा नये, एका व्यक्तीसाठी एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठो तो किरकोळ भाग आहे, त्यांनाही माहीत आहे. कुठलातरी एक दगड घ्यायचा तो मारायचा आणि नंतर बघत बसायचं.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय "याची विविध कारणंही असू शकतात, जसं की मुंबईतील जो कोविड घोटाळा निघालेला आहे. जो घोटाळा निघाला आहे, त्यामध्ये त्यांचा सहभाग किती, काय हे त्यांना आणि चौकशी करणाऱ्या यंत्रणेला माहीत असेल, मग या माध्यमातून कुठंतरी या यंत्रणेवरच एक साशंकता निर्माण करायची आणि लक्ष विचलित करायचं, असा एक कार्यक्रम असू शकतो.

तसेच त्यामुळे अशा पद्धतीच्या भेकड लोकांबाबत, त्यांनी कुठलेही मुद्दे उपस्थित केले तरी त्याला उत्तर देण्याइतपत मला फारसं त्यामध्ये तथ्य आहे, असं वाटत नाही. कारण मी त्यांच्या प्रश्नावलीत गेलो आहे आणि त्याचं लिखित एक पत्रक तयार केलेलं आहे. प्रसार माध्यम त्यातील सर्व मुद्दे पाहू शकतात,'' असंही सावंत यांनी या वेळी सांगितलं.

याचबरोबर ''मागील वर्ष दीड वर्ष मी या खात्याचा कारभार सांभाळतो आहे. या संबंधी मागील महिना-दीड महिन्यात केंद्राचं एक अल्पकालीन अधिवेशन झालं. त्यावेळी आरोग्य विभागाने घेतलेले २२ निर्णय आपण सर्वांनी बघितले असतील. खात्याचं काम करत असताना विविध प्रकारचे अभियानरूपी उपक्रम महाराष्ट्रात आपण वेळोवेळी राबवले.''

तसेच ''प्रसार माध्यमांनी वेळोवेळी यास प्रसिद्धी देऊन आरोग्य विभाग कशाप्रकारे काम करतं आहे, यंत्रणा तीच आहे, लोकं तीच आहेत फक्त त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचं होतं. याच लोकांच्या मध्यमातून प्रचंड काम मागील वर्ष-दीड वर्षात झालं आहे,'' असंही सावंत म्हणाले.

तसेच ''त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत, की संचालकांची पदं भरलेली नाहीत, बदल्यांबाबत मोठा गैरव्यवहार झाला, असा आरोपही झाला. खरंतर एवढ्या मोठ्या वर्तमानपत्राचे ते संपादक आहेत, असं सांगितलं जातं; पण जर अर्धवट माहिती घेऊन कोणी बोलत असेल तर ते योग्य नाही.

कारण मला सांगायला आनंद वाटतोय की 11 मे 2023 सर्व बदल्यांचे अधिकार आयुक्तांना दिले गेले आहेत. ऑनलाइन बदल्या किंवा विनंती बदल्या या सर्वांचे अधिकार मी मे महिन्यातच प्रशासनाला दिले आहेत,'' अशी माहिती या वेळी सावंत यांनी दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT