Maharashtra Municipal Election Counting : राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा खेळखंडोबा सुरू असल्याचं चित्र आहे. उच्च न्यायालयाने राज्यात आज होत असलेल्या निवडणुकांचा मतमोजणी उद्याऐवजी 21 डिसेंबरला करण्याचा निर्णय दिल्यानंतर, राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर सत्ताधाऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे.
काँग्रेसने वोट चोरीचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर लावून धरला आहे. दुबार मतदारांचा (Voter) मोठा घोळ सुरू आहे. तसंच बोगस मतदारांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. यातून केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार फेरआढावा मोहीम (एसआयआर) सुरू केली आहे. पण या मोहिमेला कितपत यश येणार, हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावर अवलंबून आहे. देशाच्या हिवाळी अधिवेशनात यावर चर्चेची मागणी होत आहे.
यातच राज्यात होत असलेल्या नगरपालिका निवडणुकांवरून गोंधळाची स्थिती आहे. राज्य निवडणूक आयोग (Election Commission) स्थानिकच्या निवडणुकांवरून पुरता गोंधळ्याची स्थिती आहे. राज्यातील काही नगरपालिकांमधील नगराध्यक्ष अन् नगरसेवकपदाच्या निवडणुका पुढं ढकलल्या गेल्या आहेत. तर आज होत असलल्या मतदानाची मतमोजणीवरून उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दणका दिला आहे. आज होत असलेल्या नगरपालिकांची मतमोजणी उद्या होण्याऐवजी सर्वच एकत्रित एकाच दिवशी २१ डिसेंबरला घेण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर सर्वपक्षीय नेत्यांनी तोंडसुख घेण्यास सुरूवात केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, निवडणुकांचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. निवडणुका म्हणजे पोरखेळ झाला आहे. राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार आहे.
सुप्रीम न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढला गेला. ओबीसीला 27 टक्के आरक्षण दिले, हे सरकारला दाखवायचे होते. हे सरकार कोणत्या दिशेने काम करते? उद्याची मतमोजणी 21 डिसेंबरला गेली. निवडणूक आयोग सरकारच्या हाताचे बाहुले झाले आहे. त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा घणाघात केला.
'राज्यात इतक्या निवडणुका झाल्या, पण याआधी, असे कधीच झाले नव्हते. यासाठी फडणवीस सरकार जबाबदार आहे. मतमोजणीत अडथळा येणं म्हणजे निवडणुका लांबणीवर टाकणं, पैशाचा वापर करणं, खरंतर हा मत चोरीचा, तर प्रकार नाही ना? निकाल बाजूने येणार नाही, हे पाहून निवडणूक निकाल फिरवण्याचा प्रयत्न करत आहे का?' असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
निवडणूक आयोगाने वेळोवेळी आदेशात बदल केले. त्यामुळे निवडणूकमध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आणि हा विषय कोर्टात गेला. त्याच्याकडे देखील कुठलाच मार्ग राहिला नाही आणि म्हणून त्यांना मोजणी पुढे ढकलली.
यामध्ये निवडणूक आयोग चुकलं आहे. भाजपचे एकूण वेगवेगळे आदेश काढले आणि त्यात गडबड झाली. आता 21 तारखेपर्यंत वाट बघावी लागणार असून EVM मशीन संदर्भात काळजी घ्यावी लागणार आहे. यातून उमेदवारांचं टेन्शन वाढल आहे, असे रोहित पवार यांनी म्हटलं.
भाजप मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी, आता निकालाची वीस दिवस वाट पाहावी लागणार आहे. निवडणुकांबाबत असा गोंधळ राज्यात कधीही झालेला नव्हता. कालपर्यंत अनेक नगरपालिका निवडणुका रद्द झाल्या, काही प्रभागांच्या निवडणुका रद्द झाल्या, हे सर्व पहिल्यांदाच होत आहे.
या प्रकारामुळे मात्र विरोधकांना पुन्हा संधी मिळाली. 18 दिवसात यांनी पेट्या बदलल्या, असा आरडाओरडा विरोधक करतील. विरोधकांनी आता या पेट्यांजवळ खाट टाकून झोपावं. एक मिनिट पेट्यांपासून बाजूला जाऊ नका, नाहीतर पुन्हा आमच्या नावाने शंखनाद सुरू करतील, असा टोला लगावला.
'ही लोकशाही आहे. लोकशाहीसाठी राज्य निवडणूक आयोग निर्दोष निवडणूक प्रक्रिया पार पाडू शकत नाही, ही अत्यंत दुर्दैुवी बाब आहे. कुणीतरी मंत्रालयातील पीए कार्यक्रम बनवतो आणि ते निवडणूक आयोग राबवतो, असे माझे मत आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी ही उच्च शिक्षित, आयएएस आहे. त्यांना दोष काय आहेत, हे सर्व माहिती आहेत. तरी अशा चुका होत असतील, तर गंभीर बाब आहे,' असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
'आयोगाचा गलथान कारभार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गोंधळ होता, अपील संदर्भात ही तसंच झालं. निवडणूक आयोगाचं नेमकं चाललंय काय? आम्ही न्यायालयाच्या निर्णयचा आदर करतो, पण जर आज मतदान होत असेल आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार असेल तर पुढील 18 दिवस किती मोठं टेन्शन उमेदवारांच्या डोक्यावर राहिलं. या सर्व कारभाराचा फटका सर्वपक्षीय उमेदवारांना बसणार आहे,' असे माजी आमदार रमेश कदम यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.