OBC protest against Maratha reservation in Maharashtra chhagan bhujbal And lakshman hake sarkarnama
महाराष्ट्र

OBC Reservation : हैद्राबाद गॅझेटवरून ओबीसींचा संताप उसळला? मुंबईकडे कूच करण्याची तयारी, दसऱ्यानंतरचा मुहूर्तही ठरला

OBC Reservation : मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाज देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाला आहे. त्या दृष्टीने मुंबईकडे कूच करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Aslam Shanedivan

Summary :

  1. महाराष्ट्र सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला ओबीसींत सरसकट आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा केला.

  2. आधीच्या गॅझेटमध्ये "पात्र" असा शब्द होता, तो काढल्याने ओबीसींमध्ये असंतोष वाढला.

  3. ओबीसी समाजाने या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे.

  4. दसऱ्यानंतर मुंबईत महामोर्चा काढून सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे.

  5. हैद्राबाद गॅझेट रद्द करण्याची मागणी पुढे येत असून महाराष्ट्रातील राजकीय तापमान वाढले आहे.

Mumbai News : राज्यातील महायुती सरकराने मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला. हैद्राबाद गॅझेट लागू करणारा शासन निर्णय काढला. ज्यात आधी पात्र असा शब्द होता. मात्र त्यानंतर तो शब्दच काढून टाकण्यात आला. याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसींतून सरसकट आरक्षण देणार असा होतो. यावरूनच आता ओबीसी समाज आक्रमक झाला असून याला विरोध करण्यासह हैद्राबाद गॅझेटच्या रद्दच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच केली जाणार आहे. मुंबईत लवकरच महामोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी दसऱ्यानंतरचा मुहूर्त ठरवण्यात आला असून हालचालींना वेगही आला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या रखडलेल्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवादरम्यान मुंबई चलो चा नारा दिला. येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले. ज्याला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांकडून पाठिंबा मिळाला. तसेच हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले. यानंतर उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारच्या शिष्ठमंडळाने जरांगेंची भेट घेतली आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या. तसेच हैद्राबाद गॅझेट लागू करण्यासह इतर मागण्यांबाबत शासन निर्णय (जीआर) जारी केला.

या शासन निर्णयावरून आता वादाची ठिणगी पडली असून ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ओबीसी समाज आणि ओबीसी नेत्यांचा तीव्र विरोध वाढला असून मंत्री छगन भुजबळ यांनी थेट जीआरविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत देखील हैद्राबाद गॅझेट लागू करणारा शासन आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे.

यादरम्यान आता ओबीसी समाज देखील मुंबईत लवकरच महामोर्चा काढणार असल्याची माहिती मिळत आहे. ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांची ऑनलाइन बैठक आज (ता.11) होणार असून मोर्चाची रणनीती आणि अंतिम तारीख ठरवण्यात येणार आहे. पण सध्या दसऱ्यानंतर हा भव्य मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती मिळत असून तो 8 किंवा 9 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. पण यावर आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ देखील ऑनलाइन उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्य सरकारने काढलेल्या जीआरविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकेतून हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला आव्हान देण्यात आले आहे. सरकारची ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्याने ती रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याचिकांवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

FAQs :

प्र.1: हैद्राबाद गॅझेटमध्ये नेमकं काय बदल करण्यात आला?
उ.1: आधी "पात्र" हा शब्द होता, तो काढून टाकल्याने मराठा समाजाला ओबीसींत सरसकट आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला.

प्र.2: ओबीसी समाजाला या निर्णयाचा विरोध का आहे?
उ.2: ओबीसींच्या आरक्षणातील हक्क मराठा समाजाला सरसकट देण्यात येत आहेत, त्यामुळे ओबीसींना आरक्षणात अन्याय होईल अशी त्यांची भीती आहे.

प्र.3: मुंबईतील महामोर्चा कधी होणार आहे?
उ.3: दसऱ्यानंतर मुंबईत मोठा महामोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे.

प्र.4: ओबीसींची मुख्य मागणी काय आहे?
उ.4: हैद्राबाद गॅझेट तात्काळ रद्द करावे, अशी ओबीसींची मागणी आहे.

प्र.5: या आंदोलनाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
उ.5: या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात आणि सरकारवर दबाव वाढू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT