Raigad Fort issue Sarkarnama
महाराष्ट्र

Raigad Fort news : धक्कादायक : रायगडावर विनापरवानगी हॉटेल, रेस्टोरंट, कॅफे आणि सिमेंट काँक्रीटचे भव्य राजवाडे..! संभाजीराजे भडकले

Raigad illegal construction : रोपवे कंपनीने कसलीही परवानगी नसताना गडावर अतिक्रमण करून हॉटेल, कॅफे, रेस्टोरेंट अशी हजारो स्क्वेअर फुटांची मोठमोठी बांधकामे केली आहेत, असा दावा संभाजीराजे छत्रपतींनी केला आहे.

Rajanand More

Illegal resorts Raigad fort : रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी किल्ले रायगडावरून सरकारवर आसूड ओढले आहेत. दुर्गराज रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आज भग्नावस्थेत असल्याचे सांगत त्यांनी रोपवे कंपनीस मात्र गडावर विनापरवानगी हॉटेल, रेस्टोरेंट, कॅफे आणि सिमेंट काँक्रीटचे असे भव्य राजवाडे बांधण्यास खुली मुभा दिल्याचा आरोप केला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. रायगडावर नव्याने बांधलेला, सरकारी दुर्लक्षाचा आणि व्यावसायिक आडमुठेपणाचा ‘हा’ भव्य राजवाडा पाहा, असे सांगत त्यांनी म्हटले आहे की, दुर्गराज रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आज भग्नावस्थेत आहे. त्याचे संवर्धन करायचे म्हटले तरी पुरातत्व विभागाच्या अगणित नियम आणि अटींचे अडथळे आहेत. अगणित बैठका, वारंवार पाठपुरावा आणि लेखी परवानग्या घेतल्याशिवाय पुरातत्त्व विभाग रायगड विकास प्राधिकरणाला गडावरील एक दगडही हलवू देत नाही. पण रोपवे कंपनीस मात्र रायगडावर विनापरवानगी हॉटेल, रेस्टोरेंट, कॅफे आणि सिमेंट काँक्रीटचे असे भव्य राजवाडे बांधण्यास खुली मुभा दिली आहे.

रोपवे कंपनीने कसलीही परवानगी नसताना रायगडावर अतिक्रमण करून हॉटेल, कॅफे, रेस्टोरेंट अशी हजारो स्क्वेअर फुटांची मोठमोठी बांधकामे केली आहेत. विशेष म्हणजे पुरातत्व विभागाने काम थांबवण्याच्या नाममात्र नोटिसा दिल्यानंतर देखील त्या डावलून ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. एका व्यावसायिक कंपनीकडे इतके धाडस व आडमुठेपणा येतो कुठून?, असा सवाल संभाजीराजेंनी केला आहे.  

जिथे या भारतभूमीने स्वातंत्र्याचा पहिला सूर्य पाहिला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेवर व नगारखान्यावर छत बसविण्याकरिता मी गेले पाच-सात वर्षे दिल्लीत पाठपुरावा करीत आहे, मात्र वास्तुरचनात्मक पुरावे असूनदेखील आजही त्यासाठी परवानगी नाकारली जाते. या ऐतिहासिक वास्तूंना छत नाही, मात्र गडावर विनापरवानगी उभारलेल्या या अनधिकृत हॉटेल्सची विद्रूप छतं जाणिवपूर्वक दुर्लक्षित केली जातात, अशी नाराजीही संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केली आहे.  

गडास भेट देणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी आवश्यक अशा मूलभूत सोयी निर्माण करताना पुरातत्व खाते रायगड विकास प्राधिकरणाला अनेक नियमांच्या चौकटी घालते. कित्येक वेळा चालू कामांना स्थगिती दिली जाते. मात्र या व्यावसायिक रोपवे कंपनीस गडावर महागडे हॉटेल, महागड्या आलिशान रूम्स, कॅफे बांधून व्यवसाय करायला खुली सूट देते! यामागचे गौडबंगाल काय, हे शोधणे गरजेचे आहे, असा संशयही राजेंनी व्यक्त केला आहे.

महाराजांच्या गडावर सरकारी नियम, नोटीसा धुडकावून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या आडमुठ्या व्यावसायिक कंपनीला कुणाचे पाठबळ आहे? रायगडच्या संवर्धनापेक्षा या कंपनीच्या आर्थिक फायद्यास अधिक महत्त्व देण्याची काय गरज आहे, अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.  

नुकताच दुर्गराज रायगड युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाला आहे. गडावर अशी बेकायदेशीर बांधकामे होत राहिली तर हे नामांकन देखील धोक्यात येऊ शकते. याला जबाबदार कोण असणार? केवळ ही कंपनी, वेळीच कठोर कारवाई न करणारा पुरातत्व विभाग, राज्य व केंद्र सरकार की या कंपनीला पाठीशी घालणारे लोक?, असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र गडावर असा उन्मत्त व्यावसायिक अतिक्रमणवाद सहन केला जाणार नाही. रायगडाच्या अस्मितेपेक्षा मोठे काहीही असू शकत नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT