

Maharashtra politics update : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, मदत न मिळणे, मतदारयाद्यांमधील घोळ, नगरपंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुकीदरम्यान झालेला राडा, अशा विविध मुद्द्यांवर विरोधकांकडून सरकारला घेरण्याची तयारी करण्यात आली आहे. तर विरोधकांना क्षीण म्हणत सत्ताधारी नेत्यांनी आधीच हवा काढली आहे.
नागपुरातील यंदाचे अधिवेशन राज्याच्या विधिमंडळाच्यादृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे. पण महाराष्ट्र आणि लोकशाहीसाठी ते भूषणावह नसेल. कारण यावेळी इतिहासात पहिल्यांदाच हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांशिवाय पार पडणार आहे. सध्या विधानसभेसह विधानपरिषदेतही विरोधी पक्षनेता नाही. विधानसभेत विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने ही नामुष्की ओढवली आहे.
किती संख्याबळ आवश्यक?
दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्यासाठी एका पक्षाकडे प्रत्येकी १० टक्के आमदार असणे आवश्यक आहे. विधानसभेत हा आकडा २९ एवढा होता. मात्र, विरोधी पक्षातील एकाही पक्षाकडे एवढे संख्याबळ नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वाधिक २० आमदार आहेत. त्याखालोखाल काँग्रेसचे १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे १० आमदार आहेत.
विधानपरिषदेत ठाकरेंच्या पक्षाचे नेते अंबादास दावने हे ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत विरोधी पक्षनेते होते. मात्र, त्यांचा सदस्यपदाचा कार्यकाळ संपला आणि हे पद रिक्त झाले. तेव्हापासून विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता नाही. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसताना विधिमंडळाचे अधिवेशन होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला. विरोधांची धुळधाण झाली. त्यानंतर झालेल्या पहिल्या अधिवेशनापासून विरोधकांकडून विरोधी पक्षनेत्यासाठी आग्रह धरला जात आहे. मात्र, विरोधी पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने विधानसभा अध्यक्षांकडून ही निवड टाळली जात आहे. विरोधकांकडून मात्र त्यासाठी दबाव टाकला जात आहे. ठाकरेसेनेचे नेते भास्कर जाधव यांचे नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिल्याचा दावाही केला जात आहे. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून त्याबाबत काहीही संकेत मिळताना दिसत नाहीत.
नागपूर अधिवेशनाच्या कामकाजपत्रिकतेही विरोधी पक्षनेता निवडीबाबतच्या कार्यक्रमाचा उल्लेख नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संपूर्ण अधिवेशनात दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसेल, अशीच दाट शक्यता आहे. विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेता हे पद अत्यंत महत्वाचे मानले जाते. या पदाला कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.