PM Narendra Modi Government Sarkarnama
महाराष्ट्र

Modi Govt 3.0 : तिसऱ्या टर्ममधील मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील 'या' खासदारांची लागणार केंद्रीय मंत्रीपदी लॉटरी?

Jagdish Patil

Modi Government Third Term : देशात नुकत्याच पार लोकसभा निवडणुकीमधील जनादेशाचे चित्र स्पष्ट झाले असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए (NDA) सलग तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सरकार स्थापन करणार आहे. परंतु, यंदाच्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे आता भाजपला मित्रपक्षांवर अवलंबून रहावं लागणार आहे.

भाजपला या निवडणुकीत 240 जागा मिळाल्या आहेत. तर एनडीए आघाडीला 293 जागा मिळाल्या आहेत. या सरकारमध्ये एनडीएचे दोन मोठे मित्र हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू ठरले आहेत. तर महाराष्ट्रातील अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेचाही सहभाग या सरकारला पाठिंबा आहे.

नरेंद्र मोदी हे 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे आता केंद्रीय मंत्रीमंडळात कोणाची वर्णी लागणार याचीच चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. महाराष्ट्रातील असे कोणते खासदार आहेत ज्यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते, ते जाणून घेऊया.

राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. मिशन 45 प्लसचा नारा देणाऱ्या महायुतीला या निवडणुकीत केवळ 18 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर भाजपाला 9 आणि शिंदेंच्या शिवसेनेचा 7 जागांवर विजय झाला आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जेमतेम एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. तर एनडीए सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये पुढील काही नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नितीन गडकरी

एनडीए प्रणित मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मंत्रीपद मिळू शकते. ते याआधीच्या मंत्रिमंडळात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री होते. नागपूरमधून सलग तिसऱ्यांदा ते निवडणून आले आहेत. मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळात त्यांनी मंत्रिपद सांभाळलं आहे. शिवाय गडकरी हा भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेते आहेत त्यामुळे त्यांची तिसऱ्यांदा मंत्रिपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

नारायण राणे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजयी झालेले भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या वाट्यालाही मंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राणे हे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असून त्यांचा कोकणात दबदबा आहे. शिवाय ते मोदींच्या सरकारमध्ये केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम खात्याचे मंत्री होते. त्यामुळे त्यांना आणखी एकदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

पीयूष गोयल

भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. ते एक अभ्यासू आणि सुशिक्षित उमेदवार असून त्यांना याआधीचा मंत्रीपदाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रीपद मिळू शकतं.

उदयनराजे भोसले

सातारा लोकसभा मतादरसंघातून विजयी झालेले उदयनराजे भोसले यांचीही केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. शरद पवार गटावर त्यांनी केलेली मात आणि छत्रपती घराण्याचा वारसा यामुळे मंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होऊ शकते.

भाजपच्या या खासदारांसह एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षातील काही खासदारांनाही मंत्रीपद मिळू शकतात.

प्रतापराव जाधव

शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आले आहेत. जाधव हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत असून शिंदेंच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रीपदात त्यांचा नंबर लागू शकतो.

श्रीरंग बारणे

मावळ लोकसभेतून तिसऱ्यांदा विजयी झालेल्या श्रीरंग बारणे यांचीही केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

श्रीकांत शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचीही मोदींच्या मंत्रीमंडळात मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुनील तटकरे

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी झालेले एकमेव उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही मंत्रीपद दिले जाऊ शकते.

प्रफुल पटेल

अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना अनेक वर्ष दिल्लीतील कामाचा अनुभव आहे. त्यामुळे पटेल यांनादेखील मंत्रीमंडळात स्थान दिले जाऊ शकते. तर भाजपची कार्यपद्धती पाहता वरील चेहऱ्यांना संधी दिली जाणार की आणखी काही धक्का तंत्राचा वापर करत नवख्या चेहऱ्यांना समोर आणलं जाणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT