Shivsena-NCP Sarkarnama
महाराष्ट्र

राष्ट्रवादी आम्हाला त्रास देते; शिवसेना खासदारांनी राऊतांपुढे वाचला तक्रारींचा पाढा

Shivsena | NCP | Congress : शिवसेनेतील नाराजी शिगेला, आमदारांपाठोपाठ खासदारही नाराज

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) नेते तीन पक्षांमध्ये सर्व काही अलबेल असल्याचे सांगत आहेत. मात्र शिवसेनेतील (Shivsena) नाराजी काही केल्या लपून राहत नाही अशी परिस्थिती आहे. यापूर्वी अनेकदा शिवसेना पदाधिकारी, आमदार आणि खासदारांची सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळे नाराजी उफाळून आल्याच पाहायला मिळालं होतं. त्यानंतर काल (सोमवार) दिल्लीत शिवसेनेच्या सर्व खासदारांनी नेते संजय राऊत यांच्यापुढे तक्रारींचा अक्षरशः पाढा वाचला.

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay raut) आणि खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात लोकसभा आणि राज्यसभेतील शिवसेनेच्या सर्व खासदारांची काल बैठक पार पडली. संध्याकाळी सुरु झालेली बैठकी रात्री ११ वाजेपर्यंत सुरु होती. याच बैठकीत सर्व खासदारांनी आपल्या अडचणी, तक्रारी बोलून दाखविल्या. यात जवळपास सर्वच खासदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रती नाराजीचा स्वर पाहायला मिळाला. याशिवाय मराठावाडा आणि विदर्भात राबवण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानातून नेमकी काय परिस्थिती आहे हे देखील खासदारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न या बैठकीत करण्यात आला.

शिवसेनेचे खासदार कोणत्या मुद्द्यांवर नाराज?

शिवसेनेचे खासदार यांनी संजय राऊत यांच्यापुढे शिवसेना मंत्री कार्यकर्त्यांची कामं करत नाहीत ही तक्रार बोलून दाखविली. याशिवाय शिवसेना कमकुवत होत चालली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटत नाहीत. पक्षाला वेळीच बळकटी दिली नाही तर निवडणुका लढवणं कठिण होईल, असा इशारा देखील बैठकीत बोलून दाखविण्यात आला. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्रास दिला जात असून सेना आमदारांना निधी दिला जात नाही. राष्ट्रवादीचे पालकमंत्री शिवसेना आमदारांना योग्य वागणूक देत नाहीत, अशी राष्ट्रवादी विषयी तक्रार करण्यात आली.

काँग्रेसचे आमदारही नाराज :

शिवसेनेचे खासदार नाराज असतानाच काँग्रेसचे आमदारही नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा प्रलंबित मुद्दा, महामंडळाच्या रखडलेल्या नियुक्त्या, आमदारांच्या निधीचे समप्रमाण वाटप या मुद्द्यांवर काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. राज्यातील आमदार राष्ट्रकुल प्रशिक्षणासाठी सध्या दिल्लीत आहे. यावेळी कॉंग्रेसच्या आमदारांनी काल कॉंग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन नाराजी दर्शविली आहे. तर आज ते सोनिया गांधी यांना भेटणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT