Jitendra Awad On Ramgiri Maharaj  Sarkarnama
महाराष्ट्र

Jitendra Awad On Ramgiri Maharaj : मुख्यमंत्री बसलेत अन् पुढं रामगिरी महाराजांची हिंमत; जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'खेळ परवडणारा...'

Pradeep Pendhare

Mumbai News : रामगिरी महाराज यांनी केलेल्या विधानाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडवणारा हा खेळ महाराष्ट्राला परवडणार नाही, असे म्हटले आहे.

"मागे स्वतः मुख्यमंत्री बसलेले असताना, हे महंत एवढे बोलण्याची हिमंत दाखवत असतील, तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू शकते", अशी शंका देखील जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

नाशिक (Nashik) इथं कार्यक्रमात रामगिरी महाराज यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान केले. रामगिरी महाराजांच्या या विधानाचे राज्यभर पडसाद उमटत आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), वैजापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात पडसाद उमटले आहेत. मुस्लिम समाज रस्त्यावर उतरून रामगिरी महाराज यांच्या विधानाचा निषेध करत आहे. रामगिरी महाराजांविरोधात राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले असून, ते त्यांच्या विधानावर ठाम आहेत. मुस्लिम समाज आक्रमक झाल्यानंतर रामगिरी महाराज यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे.

रामगिरी महाराज यांच्या या विधानावर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या असून, सरकारवर निशाणा साधत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करत एक मोठी शंका उपस्थित केलीय. रामगिरी महाराज यांनी केलेले विधान हे मुद्दामहून केले आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेत तुम्ही कोणत्याही संतसाहित्य उघडून बघा, संतांच्या अभंगांचे पुस्तक उघडून बघा, संत कबीर, संत रविदास, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पुस्तके उघडून बघा, तुम्हाला कुठेही धर्मद्वेष दिसणार नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटले.

तसंच, रामगिरी महाराज ज्या पद्धतीने बोलले आहेत; त्याकडे पाहता, हे शब्द मुद्दामहून त्यांच्याकडून वदवून घेण्यात आलेत, असेच होते. मागे स्वतः मुख्यमंत्री बसलेले असताना, हे महंत एवढे बोलण्याची हिमंत दाखवत असतील, तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू शकते, अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

"ते जाऊ द्या! पण, महाराष्ट्रातील धार्मिक तसेच सामाजिक स्वास्थ्य त्यानिमित्ताने हे सत्ताधारी बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. हा खेळ आता महाराष्ट्राला जाळून टाकेल, महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडवून टाकेल अन् हा खेळ महाराष्ट्राला परवडणार नाही", अशी भीती देखील जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. सत्ता येते अन् जाते. पण, एकदा मने दुभंगली की ती जोडता-जोडता आयुष्य निघून जाते. या द्वेषाच्या राजकारणापासून आपण सर्वांनीच लांब रहायला हवे, असे आवाहन देखील आव्हाड यांनी शेवटी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT