Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस शिल्लक आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच दिसत आहे. जागावाटप जाहीर न झाल्याने येत्या काळात महायुतीमधील तीन पक्षाचे नेते एकमेकाविरोधात रिंगणात उतरणार असल्याचे दिसत आहे.
काही ठिकाणी महायुतीमध्ये तडजोड होत नसल्याने तीन पक्षातच मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच आता रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली असे सांगितले जात असताना या जागेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदाराच्या कन्येने थेट बंड केले असून विधानपरिषद निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये पहिली ठिणगी पडली आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मोठी घडामोड घडली आहे. याठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अनिकेत तटकरे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे याठिकाणी अनिकेत तटकरे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरु असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष म्हणून विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राज्यात महायुतीमध्ये पहिली बंडखोरी झाली असून महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तटकरे दिलेला शब्द कधीच पाळत नसल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, असा ठाम निर्धार जुईली दळवी यांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे याठिकाणी महायुतीमधील शिंदे सेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत लढणार का? याची उत्सुकता लागली आहे.
या मतदार संघातील संख्याबळ पाहिले तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना एक नंबरवर आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात एकूण 823 मतदार संख्या आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना 275, भाजप 241, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 149 तर महाविकास आघाडी व अपक्ष मिळून 158 सदस्य आहेत. त्यामुळे याठिकाणी महायुतीचे पारडे जड असणार आहे त्यांचे एकत्रित 665 मतदार आहेत. मात्र, महायुतीमध्ये फाटाफूट झाल्यास दोन पक्ष एकत्रित येतील त्यांचा उमेदवार विजयी होणार आहे.
त्यामुळे आता या मतदारसंघातील हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीचे जागावाटप शनिवारी रात्रीपर्यंत ठरणार आहे. त्यामुळे या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही जागा महायुतीमधील कोणत्या पक्षाला सुटणार यावर बरेच काही अवलंबुन आहे. त्यामुळे 4 जून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यादिवशी याठिकाणचे चित्र समजणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.