Mumbai News : शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली. त्यानंतर सातत्याने दसरा मेळाव्याचे आयोजन शिवाजी पार्क केले जाते. शिवसेनेचा हा 60 वा दसरा मेळावा होता. 2022 साली शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा स्वतंत्र मेळावा पार पडत आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यातच या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने 1995 पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदाच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मानाचे पान मिळाले. या मेळाव्यात धाराशिव-कळंबचे खासदार कैलास पाटलांनी पहिल्यांदाच विचारांचे सोने लुटताना संधी मिळताच थेट मंचावरून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
धाराशिव जिल्हा सुरुवातीपासुनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले होते. त्यानंतर 1996 पासून 1998 व 2009 या दोन वेळेसचा अपवाद वगळता याठिकाणी शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. 2024 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व कैलास पाटील व प्रवीण स्वामी हे दोन आमदार निवडून आले तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तानाजी सावंत हे निवडून आले. चार महिन्यापूर्वी धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा ऐतिहासिक दसरा मेळावा शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर उत्साहात पार पडला. मंगळवारी शिवाजी पार्कवर झालेल्या दसऱ्या मेळाव्यात धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी आक्रमकपणे विचार व्यक्त करताना राज्यातील महायुती सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली.
राज्यातील शेतकरी अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, उत्पादन खर्चात वाढ, बाजारातील घसरण आणि आर्थिक संकट या संकटात अडकला आहे. त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे. अशा परिस्थितीत जुन्या कर्जमाफीचा आधार घेत महायुती सरकारने मदतीपासून त्याला वंचित ठेवणे हा शेतकऱ्यांवरील घोर अन्याय केला असल्याचे स्पष्ट केले. त्यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची तुटपुंजी मदत करण्यावरून धारेवर धरले. ही मदत देण्यापूर्वी गेल्या काही दिवसापासून नमो शेतकरी सन्मान योजनेचे दोन हप्ते रखडले आहेत ते वेळेवर शेतकऱ्यांना देण्याची मागणी देखील जोरकसपणे लावून धरली.
यावेळी सामान्य जनता दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईने कशाप्रकारे अडचणीत आली आहे याचा पाढाच वाचला. गेल्या दहा वर्षात महागाईचा आगडोंब कशा प्रकारे उसळला आहे याची यादीच भरसभेत वाचून दाखवली. 2014 सालीचे साखर, सोयाबीन तेल. पाम तेल, तूरदाळ व हरभरा दाळीचे भाव व आजचे बाजारभाव सांगत सरकारच्या कारभाराची पोलखोल केली. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली पाच हजारची मदत केवळ दिखावा असल्याचे स्पष्ट केले तर दुसरीकडे विधिमंडळाच्या अधिवेशनात सातत्याने शेतकऱ्यांचे जिव्हळ्याचे प्रश्न लावून धरताच आहे, त्याप्रमाणे येत्या काळात दुष्काळाच्या काळातही शेतकऱ्यांच्या बाजूने कायम खंबीरपणे उभे राहणार असल्याचे कैलास पाटील यांनी स्पष्ट केले.
कैलास पाटील यांची फेसबुक पोस्ट चर्चेत...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा ऐतिहासिक दसरा मेळावा लाखो शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर उत्साहात पार पडला. यंदा प्रथमच या ऐतिहासिक व्यासपीठावरून मला माझे विचार मांडण्याचा सन्मान मिळाला, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची, भावनिक आणि आयुष्यभर स्मरणात राहणारी अविस्मरणीय बाब आहे..
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी पावन झालेल्या आणि लाखो शिवसैनिकांच्या निष्ठेने भारलेल्या शिवतीर्थावर उभे राहून बोलताना मन अभिमानाने भरून आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि शिवसेनेच्या भगव्या विचारांसाठी आपली भूमिका मांडण्याची मिळालेली ही संधी म्हणजे केवळ सन्मान नव्हे, तर शिवसेनेप्रती असलेल्या निष्ठेची आणि जनतेप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा क्षण आहे..
शिवतीर्थावरून व्यक्त झालेले माझे शब्द हे केवळ माझे विचार नव्हते, तर संकटांनी होरपळलेल्या महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांच्या वेदना, त्यांच्या संघर्षाची कहाणी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा बुलंद आवाज होता. बळीराजाच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार या व्यासपीठावरून अधिक दृढ झाला.. शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि उद्धवसाहेबांचे नेतृत्व यांच्याशी एकनिष्ठ राहत, महाराष्ट्राच्या हितासाठी, शेतकरी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचा संघर्ष यापुढेही अखंड सुरू राहील..शिवतीर्थावर मिळालेला हा सन्मान सदैव हृदयात जपेन आणि शिवसेनेचा भगवा अधिक अभिमानाने फडकवत राहीन, असे कैलास पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.