Kalyan-Dombivli reservation draw sparks political excitement; women’s reservation reshapes power equations in upcoming civic polls. Sarkarnama
महाराष्ट्र

Kalyan-Dombivli Municipal Reservation : आरक्षणाने राजकीय समीकरणे बदलली; शिंदे पिता-पुत्राला धक्का! भाजपला सर्वाधिक लाभ?

Kalyan-Dombivli BJP Shivsena : कल्याण डोंबिवली महापालिकेचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षणामुळे नवीन राजकीय समीकरण पाहण्यास मिळू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शर्मिला वाळुंज

Kalyan-Dombivli News : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभाग आरक्षण जाहीर झाले. यंदा प्रथमच लागू झालेल्या पॅनेल पद्धती आणि महिला तसेच मागास प्रवर्गासाठी राखीव जागांचा मोठा वाटा यामुळे शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत.

भाजपला या आरक्षणाचा तुलनेने फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांना धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. मजबूत संघटन, महिला उमेदवारांची उपलब्धता आणि कार्यक्षम निवडणूक यंत्रणा यामुळे भाजप आघाडी घेण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचा हा बालेकिल्ला असल्याने त्यांची स्थिती अद्याप मजबूत आहे. मात्र, पॅनेल पद्धतीमुळे अंतर्गत गटबाजी काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.

तथापि, महिला आरक्षणाच्या वाढीमुळे काही अनुभवी नगरसेवकांची तिकीटं धोक्यात आली आहेत. तर भावनिक लाट आणि जनतेशी असलेले स्थानिक नाते ठाकरे गटाला बळ देऊ शकते. संघटन मर्यादित असले तरी स्थानिक कार्यकर्त्यांना पुढे करून ते मतदारांशी संपर्क वाढवतील.

मनसेसाठी हे आरक्षण निवडक ठिकाणी आक्रमक लढ्याची संधी ठरू शकते. नागरिकांच्या प्रश्नांवरील कामगिरी आणि ठाम भूमिका यामुळे काही ठिकाणी त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. तर मागास प्रवर्गातील काही पॅनेलमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतपेढी भेदण्याची संधी मिळू शकते.

कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सभागृहात युवावर्गाची लक्षणीय उपस्थिती होती. भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. अनेक दिग्गजांच्या पॅनेलमध्ये मनासारखे आरक्षण पडल्याने आनंदाच्या घोषणा झाल्या.

काही ठिकाणी महिला आरक्षण पडताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला, तर काही सर्वसाधारण गटातील इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत “आता घरातील महिलांना उभे करतो” असे म्हणत नवीन गणित मांडायला सुरुवात केली.

पक्षांतर्गत संघर्ष उफळणार

आरक्षण घोषित झाल्यानंतर पक्षांतर्गत संघर्ष उफाळण्याची शक्यता वाढली आहे. उपप्रभागांना अ, ब, क, ड अशी क्रमवारी देण्यात आली असली तरी सीमारेषा स्पष्ट न झाल्याने इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कोणता भाग कोणत्या पॅनेलमध्ये आहे याचा खुलासा अद्याप न झाल्याने तिकीट मागणीची गती मंदावली आहे.

पुढील काही दिवसांत हरकती आणि सूचनांचा कालावधी सुरू होणार असून, त्यानंतरच तिकीट वाटपाचे खरे राजकीय गणित पुढे सरकेल, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT