Karjat-Jamkhed News sarkarnama
महाराष्ट्र

Karjat Jamkhed News: आमदारांमुळे कर्जत-जामखेडमध्ये मतदारांना डबल धमाका

राजेंद्र त्रिमुखे

Nagar: यंदाची दीपावली आपल्या मतदारसंघात गोड करण्याचा चंग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी बांधला आहे. कुठे साखर वाटप, कुठे फराळ वाटप तर महायुती सरकारचा आनंदाचा शिधा वाटप करण्यात जिल्ह्यातील आमदार-खासदार व्यग्र आहेत. यात आता नेहमीच राजकीय संघर्षामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांनी आपणही मागे नसल्याचे दाखवण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

सरकारच्या विविध योजनांना मिळणारा निधी दोन्ही आमदार अधिकाधिक आपल्या पदरात पाडून त्याची व्यवस्थित प्रसिद्धी होईल, याचीही काळजी घेत आहेत. मात्र, यातून नागरिकांची प्रलंबित रस्ते वा इतर प्रलंबित योजनांची कामे मार्गी लागत असून, दोन आमदारांमुळे मतदारांना डबल धमाका पाहावयास मिळत असून, त्याची प्रचिती दीपावलीच्या सणातूनही पाहावयास मिळणार आहे.

रोहित पवार यांनी मागील महिन्यात पुणे जिल्ह्यातून युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती. मात्र, यात्रा सुरू असतानाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणादरम्यान राज्यात बहुतांशी गावात आणि शहरात मराठा कार्यकर्त्यांनी मंत्री, लोकप्रतिनिधींना गावबंदी सुरू केली. या गावबंदीचा अनुभव रोहित यांनाही एका ठिकाणी आला. आणि एकूणच राज्यातील चिघळलेली परिस्थिती पाहता त्यांनी आपली युवा संघर्ष यात्रा तात्पुरती स्थगित केली.

दरम्यान, आता जरांगे पाटलांनी दोन महिन्यांचा अल्टिमेटम दिल्याने आंदोलन शांत आहे. त्यात आता दीपावलीचा सण आल्याने रोहित पवारांनी आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. 12 नोव्हेंबरला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडीत ते दीपोत्सव साजरा करणार आहेत. काल शुक्रवारपासून रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघात ठिकठिकाणी भेटी देत दीपावलीनिमित्ताने विविध सहकारी संस्थांच्या दिवाळी बोनस वाटप कार्यक्रमास उपस्थिती लावत नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत.

दुसरीकडे राम शिंदे यांनीही येत्या 16 नोव्हेंबर रोजी आपल्या चौंडी गावी दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. राम शिंदे दरवर्षी चौंडीत दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित करून या निमित्ताने मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधतात.

2019 ला बारामतीकर असलेले रोहित पवारांची कर्जत-जामखेडचे आमदार झाले. तेव्हापासून रोहित पवार-राम शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाचा दिसून आला. आता पुढील वर्षी 2024 च्या विधानसभा निवडणुका पाहता हा संघर्ष आणि चढाओढ वाढत जाणार अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे यंदाची दिवाळीच्या निमित्ताने दोन्ही आमदारद्वयी मतदारसंघांवर अधिकचे लक्ष ठेवून आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT