Pravin Darekar Sarkarnama
महाराष्ट्र

Pravin Darekar : आमदार पवार 'महाराष्ट्राचं नेतृत्व' करणार; शरद पवारांच्या विधानावर प्रवीण दरेकरांनी टायमिंग साधलं

Pradeep Pendhare

Mumbai News : शरद पवार यांनी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाबाबत कर्जत-जामखेडमधून मोठं विधान केलं होते. आमदार रोहित पवार पुढं महाराष्ट्राचं नेतृत्व करताना दिसतील. याचा अर्थ महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आल्यावर आमदार पवारांना मंत्रीपद निश्चित मानलं जाऊ लागलं आहे.

यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टायमिंग साधलं. शरद पवारांच्या आमदार पवारांबाबतच्या विधानाचा वेगळाच अर्थ काढला. 'यापुढं आमदार पवार कर्जत-जामखेडमध्ये असणार नाहीत, आणि कर्जत-जामखेडची जनता याचा विचार करेल', असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.

भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर नांदेड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महायुतीमधील जागा वाटपासह इतर मुद्यांवर त्यांनी परखड मतं मांडली. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेडमधील आमदार रोहित पवार यांच्याविषयी केलेल्या विधानाकडे लक्ष वेधले. त्यावर प्रवीण दरेकर यांनी चांगलचं टायमिंग साधलं.

प्रवीण दरेकर म्हणाले, "महाराष्ट्राचं नेतृत्व करतील याचा अर्थ, कर्जत-जामखेडमध्ये ते असणार नाहीत. कर्जत-जामखेडची जनता याचा विचार नक्की करतील. महाराष्ट्रात काम करायचं असेल, तर कर्जत-जामखेड कोण बघणार?" कर्जत-जामखेडची जनता त्यांना महाराष्ट्रात जाऊ देणार नाही. त्यामुळे नेतृत्व करायचा प्रश्नच येत नाही. ज्यांना मतदारसंघाची काळजी नाही, त्यांना निवडूनच कशाला द्यायचं, असा विचार तेथील जनता करेल, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

शरद पवार काय म्हणाले होते

"आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलवत वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाच वर्षे तुमची सेवा केली, आता महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी रोहित पवारांना देऊ, कारण महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे", असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी जामखेडच्या खर्डा येथील कार्यक्रमात म्हंटले होते.

शरद पवारांनी आमदार शिंदेंना फटकारलं

भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांचा अनुल्लेख करत, एमआयडीसीवरून शरद पवार यांनी चांगलच फटकारलं होतं. शरद पवार म्हणाले, "जुन्या लोकप्रतिनिधीकडून विरोध, अडचणी आणण्याचे काम कसे झाले, हे कर्जत-जामखेड मतदारसंघानं बघितलं. एमआयडीसी होतेय म्हटल्यावर जुन्या लोकप्रतिनिधीला आनंद व्हायला हवा होता. कारण यामुळं अनेक लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. पण एमआयडीसी होतेय म्हटल्यावर त्याला विरोध करणे, अडचणी आणण्याचे काम सुरू केले". रोहित पवारांच्या प्रयत्नामध्ये अनेकांनी अडथळे आणण्याचे काम केले. पण दोन महिन्यांनी राज्यातील चित्र बदलणार आहे. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात, असेही शरद पवार यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT