Dhananjay Munde And Karuna Munde  Sarkarnama
महाराष्ट्र

Karuna Munde : खोटे गुन्हे दाखल करून खटल्यात गोवले; करूणा मुंडेंकडून धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

Karuna Munde News : करूणा मुंडे यांनी खोटे गुन्हे लावल्याचा आरोप करत धनंजय मुंडेंकडून पाच कोटींची नुकसानभरपाई मागितली आहे. उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी होत असून सरकारचा अहवाल पुढील तारखेला सादर होणार आहे.

Jagdish Pansare

High Court News : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करूणा मुंडे-शर्मा यांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करून खटल्यांमध्ये गोवण्यात आल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत केला आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आपल्याला पाच कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही करूणा यांनी केली आहे.

या संदर्भात करुणा मुंडे यांचे वकील ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांनी माहिती दिली. खंडपीठात न्या. संदीप मोरे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्यापुढे मंगळवारी सुनावणी निश्चित होती. परंतु मुख्य सरकारी वकिलांच्या घरी दुःखद घटना घडल्यामुळे ते स्वतः सुनावणीला हजर राहू शकले नाहीत. या सुनावणीवेळी सरकारकडून एक अहवाल दाखल करणे अपेक्षित होते. परंतु आता हा अहवाल दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या सुनावणीवेळी सादर करण्यात येईल.

करुणा मुंडे यांच्या याचिकेनुसार त्यांच्यावर परळीत खोटे गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या वाहनात पिस्तूल ठेवण्यासारखा प्रकार, सरकारी कचेरीत नोकरी असलेल्या महिलेच्या तक्रारीवरून करुणा मुंडे यांच्याविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याचा बेकायदेशीर गुन्हा दाखल करणे, पोलीस कोठडीत छळ आदी घटना घडल्या असून, करूणा मुंडे यांना याच खोट्या गुन्ह्यांमधून परळी व पुण्यामध्ये प्रत्येकी 15 दिवस मिळून एक महिना कोठडीत राहावे लागले.

या सर्व प्रकरणाचा चौकशी अहवाल सरकारला सादर करावयाचा असून, या प्रकरणांमध्ये झालेल्या त्रासाबद्दल करूणा मुंडे यांनी पाच कोटींची नुकसान भरपाई देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. त्यावर आता दोन आठवड्यांनी सुनावणी ठेवण्यात आल्याचे ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितले. करूणा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांच्यात यापूर्वीही काही वाद न्यायालयात सुरू असून, मागील आठवड्यात पोटगी प्रकरणात मुंबईत उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे.

दोघांमध्ये कौटुंबीक वाद असून तडजोडीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्या. अनुजा प्रभूदेसाई यांना मध्यस्थ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी पुढील 16 जानेवारी 2026 पर्यंत अहवाल सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. धनंजय मुंडे यांच्या पहिल्या लग्नाच्या पत्नी आपण असून, त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले, असा दावा करुणा मुंडे यांनी अनेकदा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT