Kalyan news : कल्याण डोंबिवली महापालिकेत बहुमत मिळाल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सत्तास्थापन करण्यासाठी जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळाली. मात्र, बहुमतासाठी दोन्ही पक्षांना एकत्र यावे लागले. त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला महापौर पद आले तर भाजपच्या वाट्याला उपमहापौर पद आले. सत्तेत एकत्रित आल्यानंतर दोन्ही पक्षामध्ये मनोमिलन होईल असे वाटत होते. मात्र, केडीएमसीमध्ये स्थायी समिती सभापती पदावर भाजपने दावा सांगितला आहे. त्यासाठी भाजपकडून स्थायी समिती सभापती पद आम्हाला मिळावे, यासाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. त्यामुळे पालिकेच्या 16 मार्च रोजी होत असलेल्या महासभेत काय होणार? याची उत्सुकता लागली आहे.
भाजपकडून (BJP) स्थायी समिती सभापती पद आम्हाला मिळावे, असा दावा केला जात आहे. यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्याने सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुतीत आहोत, जो काही निर्णय होईल, तो सामंजस्यपणाने होईल, अशी भूमिका घेतली आहे.महापालिकेच्या निवडणुकानंतर महासभा घेतली जात नसल्याच्या मुद्यांवरून शिवसेना ठाकरे गटासह भाजप आक्रमक झाली होती. अखेर 16 मार्च रोजी महासभा घेण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले.
या महासभेत महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहता स्थायी समिती, महिला बाल कल्याण समिती आणि शिक्षण समितीत सदस्यांची निवड केली जाणार आहे. सदस्य निवडणूकीची प्रक्रिया पार पडल्यावर स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक जाहीर केली जाणार आहे. 16 मार्च नंतर लगेच स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक घेतली जाणार आहे.
महापौर पद शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडे आहे. तर उपमहापौर पद भाजपकडे आहे. ही दोन्ही पदे शिंदे गट आणि भाजपच्या वाट्याला आली असली तरी भाजपने आत्ता स्थायी समिती सभापती पद आणि सभागृह नेते पदावर दावा ठोकला आहे. स्थायी समिती ही महापालिकेची तिजोरी असते. या तिजोरीच्या चाव्या भाजपला आपल्या हाती ठेवायच्या आहे. त्यामुळे भाजपने स्थायी समिती सभापती पदासाठी आग्रह धरला आहे.
भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मागणी केली आहे की, स्थायी समिती सभापती पद आणि सभागृह नेते पद भाजपला मिळावे. आम्ही निवडणूका युतीत लढलो. पद नाही मिळाले तर काय केले पाहिजे ? असा विषयच नाही. महायुतीच्या वाटाघाटीत भाजपला हे पद मिळेल, असे भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांनी सांगितले. शिंदे गटाचे गटनेते विश्वनाथ राणे म्हणाले की, भाजपने स्थायी समिती सभापती पदाची मागणी केली असली तरी दोन्ही पक्षाचे नेते याबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे यामध्ये काय निर्णय होणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.