Sunil Tatkare And Uday Samant sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra MLC election: रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गात राजकीय भूकंपाची नांदी! राष्ट्रवादीची पीछेहाट अन् शिवसेनेचा वाढता आलेख; उमेदवार कोण?

Political News : महायुतीत भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली असून तीन क्रमांकावर आहे. त्यामुळे या जागेवरून महायुतीमध्ये कलगीतुरा रंगणार आहे.

Sachin Waghmare

Ratanagiri News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रिक्त असलेल्या 17 जागासाठी आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून राजकीय घडामोडीना वेग आला आहे. त्यातच आता गेल्या काही दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य नसल्याने रिक्त असलेल्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. त्यातच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये महायुतीमधील तीन पक्षातच जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मतदारसंघात वर्चस्व वाढवले आहे. त्यामुळे ही जागा शिवसेना आपल्याकडे राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले, तर महायुतीत भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली असून तीन क्रमांकावर आहे. त्यामुळे या जागेवरून महायुतीमध्ये कलगीतुरा रंगणार आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा इतिहास पाहता याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) वर्चस्व राहिले आहे. या जागेचे प्रतिनिधित्व खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांनी केले होते. मात्र, आता राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे आणि कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षनिहाय संख्याबळ पाहता, या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे.

नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने वर्चस्व वाढवले आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेने आपल्याकडे राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले, तर महायुतीत या जागेवरून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे, शिंदे यांच्या शिवसेनेखालोखाल भाजपचे संख्याबळ आहे. त्यामुळे याठिकाणी शिवसेना व भाजपमध्ये रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेनेचे (Shivsena) संख्याबळ अधिक आहे. याठिकाणी एकूण 831 मतदार आहेत. यामध्ये एकट्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सदस्यांची संख्या 289 वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत, ज्या पक्षाकडे सर्वाधिक संख्याबळ त्यांच्याकडे असल्याने या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे.

या निवडणुकीत ''गुरू-शिष्यांची'' राजकीय लढाई होणार आहे. खासदार सुनील तटकरे हे मंत्री उदय सामंत यांचे राजकीय गुरू मानले जातात. मात्र, आता राजकीय अस्तित्वाची वेळ आल्यावर उदय सामंत आपल्या शिवसेनेसाठी ही जागा पदरात पाडून घेण्यात यशस्वी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनील तटकरे आपल्या मुलासाठी पुन्हा एकदा आग्रही राहणार हे निश्चित मानले जात आहे; परंतु शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही वाढलेल्या संख्याबळाच्या जोरावर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केल्याची अंतर्गत चर्चा सुरू आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सध्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी अनेक बड्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षकाडून माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह राजीव साबळे, अजित यशवंतराव यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर ऐकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजपकडून अद्याप नावे पुढे आली नाहीत. मात्र या दोन्ही पक्षाने या जागेवर दावा ठोकून तयारी सुरु केली आहे.

महायुतीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या जागेवरून मोठा पेच निर्माण होऊ शकतो. अनिकेत तटकरे यांनी यापूर्वी या मतदारसंघाचे नेतृत्व केले असले तरी, आता जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये शिवसेनेने मिळवलेले यश राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरू शकते. कोकणात उदय सामंत यांनी ज्या पद्धतीने पक्षाची बांधणी केली आहे, त्यातून शिवसेनेने भाजपला मागे सारत सर्वाधिक संख्याबळ गाठले आहे. आता हाच आकडा विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे कोकणच्या या राजकीय आखाड्यात कोण वरचढ ठरतात याकडे लक्ष लागले आहे.

कोकण विभागात शिंदे शिवसेनेचे २८९ सदस्य आहेत. त्यात जिल्हा परिषद सदस्य ७७, पंचायत समिती सभापती १८ आणि नगरपालिका सदस्य १३२ आहेत. तर भाजपचे संख्याबळ २८५ असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सदस्यांची संख्या केवळ १०६ इतकी मर्यादित आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये कॊणत्या पक्षाला जागा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT