Eknath Shinde And uddhav thackeray sarkarnama
कोकण

Criminal Case : कर्नाटकातील फौजदारी खटल्यातून शिंदेंच्या शिलेदारासह ठाकरेंच्या बड्या नेत्याची निर्दोष मुक्तता

Karnataka-Maharashtra Politics : सीमा प्रश्नावरील आंदोलनाच्या फौजदारी खटल्यातून पुराव्याअभावी माजी मंत्री रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे-पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Aslam Shanedivan

Karnataka/Maharashtra News : बेळगाव-खानापूर न्यायालयाने सीमा प्रश्नावरील आंदोलनाच्या फौजदारी खटल्यात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कथित चिथावणीखोर भाषणप्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे-पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या खटल्याचा निकाल लागला असून, सबळ पुराव्याअभावी दोन्ही नेत्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालामुळे दोन्ही नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खानापूर येथे २००६ मध्ये झालेल्या युवा महामेळाव्यातील कथित चिथावणीखोर भाषणप्रकरणी सुरू असलेल्या जुन्या फौजदारी खटल्याचा अखेर निकाल लागला असून, येथील प्रिन्सिपल सिव्हिल जज अँड जेएमएफसी न्यायालयाने शिवसेना नेते रामदास कदम आणि नितीन बानगुडे-पाटील यांची आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी (ता. ११) निकाल दिला.

दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीसाठी काही अपरिहार्य कारणामुळे रामदास कदम आणि नितीन बानगुडे-पाटील हजर राहिले नसताना हा निकाल लागला. या दोघांची निर्दोष मुक्तता झाल्याने सीमावासीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

२६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापूर येथील ताराराणी हायस्कूलच्या मैदानावरील युवा महामेळाव्यात कथित भाषणावरून पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या तक्रारीनुसार, भाषणातून मराठी भाषकांना कन्नड भाषकांविरोधात भडकविण्यात आल्याचा, तसेच समाजात द्वेष निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यास तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी जमावाला प्रवृत्त केल्याचेही आरोप एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले होते. यावेळी साक्षीदार म्हणून महादेव घाडी, यशवंत बिर्जे यांनी साक्ष दिली होती. या प्रकरणात रामदास कदम यांच्या वतीने फौजदारी वकील ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर आणि ॲड. जोतिबा पाटील यांनी कामकाज पाहिले.

दोन वेळा अटक वॉरंटही जारी

या प्रकरणाची सुनावणी तब्बल 20 वर्षे चालली असून, प्रदीर्घ सुनावणीदरम्यान माजी मंत्री रामदास कदम आणि नितीन बानगुडे-पाटील हे न्यायालयात हजर राहत नव्हते. यामुळे या दोघांविरोधात दोन वेळा अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते यशवंत बिर्जे आणि महादेव चाडी यांनी न्यायालयात हजर होत जामीनदार म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. तर रामदास कदम यांना 10 लाख रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT