
Mumbai News : दसरा मेळाव्यात आक्रमकपणे आरोप करणारे माजी मंत्री रामदास कदम आता चांगलेच बॅकफूटवर आले आहेत. गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांच्या विरोधात आक्रमकपणे आरोप केले. त्यामुळेच त्यांची मोठी अडचण झाली. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी नेत्यांची फोजच मैदानात उतरली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकही नेता त्यांच्या मदतीला धावला नाही अथवा त्यांची बाजूही घेतली नाही. तर दुसरीकडे गेल्या चार दिवसांत त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव योगेश कदम यांच्या अडचणी वाढतच चालल्याने रामदास कदमांनी त्यांची आरोपांची तलवार म्यान करीत बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूप्रकरणात दोन पावले मागे घेत युटर्न घेतला.
दसरा मेळाव्याच्या दिवशी रामदास कदम यांनी त्यांच्या भाषणातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टार्गेट करीत आरोप केले. त्यांनी केलेल्या या धक्कादायक विधानामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. यावेळी कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव मातोश्रीमध्ये दोन दिवस ठेवले होते. त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असा गंभीर आरोप कदम यांनी केला होता. त्यामुळे कदम यांच्यावर विरोधकांनी जोरदार मोहीम उघडली होती.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल परब, अरविंद सांवत, चंद्रकांत खैरे व सुषमा अंधारे यांनी कदम यांच्यावर आरोप करताना त्यांची लायकी काढली. तर दुसरीकडे अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत सर्व काही स्पष्ट करीत बाळासाहेबांच्या निधनानंतर काय-काय झाले होते हे स्पष्ट करीत कदम यांच्या या सर्व आरोपातील हवाच काढून टाकली होती.
यावेळी अनिल परब यांनी त्याउलट कदम यांच्यावर गंभीर आरोप करीत संधी मिळताच पुन्हा घेरले होते. यावेळी अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर पुन्हा एकदा जहरी टीका केली होती. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. मंत्री कदम यांच्या आईच्या नावाने चालवत असलेला डान्सबार व वाळू चोरी प्रकरणावरून कोंडी केली तर दुसरीकडे रामदास कदम यांच्यावर आरोप करताना त्यांनी १९९३ साली स्टोव्हचा भडका उडाला की जाळण्याचा प्रयत्न केला ? असा सवाल करीत कोंडी केली होती.
रामदास कदम यांच्यावर झालेल्या या गंभीर आरोपानंतर त्यांनी पत्नीसह पत्रकार परिषद घेत केलेले सर्व दावे फेटाळले. त्यासोबत स्वयपांक करीत असताना त्याकाळी स्टोव्हचा भडका उडाला त्यामुळे पत्नीला जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले होते, हे सांगत त्यांनी परब यांनी केलेले दावे फेटाळून लावले होते. दुसरीकडे रामदास कदम यांना त्यांच्यावरील आरोपांना उत्तरे द्यावी लागत होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते एकाकी पडल्याचे चित्र दिसत होते. त्यांच्या मदतीला इतर नेता धावून आला नाही.
दुसरीकडे कदम यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास कदम यांना स्वतःचेच शब्द गिळण्याची वेळ आली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी होईल, असे कुठलेही वक्तव्य मला करायचे नाही. बाळासाहेब आमचे दैवत आहेत. उद्धव ठाकरेंनी मला सांगितले होते की हाताचे ठसे.... आपण घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील पायाचे ठसे घेतलेले आहेत. तसेच आमचे दैवत म्हणून बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले असतील तर त्यात वाईट काय? परंतु अनिल परब यांना असे वाटते की, मी स्वीस बँकेसाठी ते बोललो आहे. बाळासाहेबांच्या बाबतीत असे घाणेरडे विचार आमच्या मनात कदापि येणार नाहीत. मी फक्त संशय व्यक्त केला होता. संपला विषय माझा. बाळासाहेबांची बदनामी होईल, असे कुठलेही वक्तव्य माझ्याकडून होणार नाही, आमचे ते दैवत आहे, असे म्हणत रामदास कदम यांनी माघार घेतली.
दुसरीकडे पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर केल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली होती. त्यामुळे मुलगा अडचणीत येताच आक्रमक झालेल्या रामदास कदमांनी त्यांची तलवार म्यान केली.
दुसरीकडे याचवेळी रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. रामदास कदम यांनी त्यांच्या या धक्कादायक वक्तव्यावरून 'यू-टर्न' घेतल्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची येत्या काळात राजकीय अडचण आणखी वाढली असून, विरोधी पक्ष यावरून जोरदार टीका करण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.