Sharad Pawar-Shekhar Nikam-Ajit Pawar Sarkarnama
कोकण

Konkan Politics : अजितदादांनंतर शरद पवारही कोकणच्या रणांगणात...चिपळूणच्या सभेत शेखर निकमांचा घेणार समाचार...

Vijaykumar Dudhale

Chiplun, 21 September : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत ज्येष्ठ नेते शरद पवार हे कोकणाच्या रणांगणांत उतरले आहेत. अजितदादांची आजच चिपळूणमध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने जाहीर सभा झाली. त्यानंतर येत्या सोमवारी (ता. २३ सप्टेंबर) शरद पवार हे चिपळूणमध्ये सभा घेणार आहेत. अजित पवारांना साथ देणारे आमदार शेखर निकम यांचा पवार हे कोणत्या शब्दांत समाचार घेतात, याकडे कोकणवासियांचे लक्ष असणार आहे.

जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज चिपळूण दौऱ्यावर आले होते. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघामधून मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम (Shekhar Nikam) निवडून आले आहेत. राष्ट्रवादीतील बंडात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली आहे. त्यांच्यासाठी आज अजितदादांनी चिपळूमध्ये जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम घेतला.

जाती धर्मात भांडणे लावणे आणि भेदभाव करण्याच्या चुकीच्या पद्धतीने कोणी वागत असेल तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देतानाच विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ द्या, कोकणसह संपूर्ण महाराष्ट्राचा गतिमान विकास साधण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असेही अजित पवार यांनी या वेळी बोलताना सांगितले.

खंबीर साथ देणारे आमदार शेखर निकम यांच्या कामाचे अजित पवार यांनी कौतुक केले. त्यांनी केलेल्या कामाची यादीच उपमुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवली. विकास कामांचा हा वेग कायम राखण्यासाठी आगामी निवडणुकीत शेखर निकम यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना निवडून द्यावे, असे आवाहनही अजित पवारांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हे प्रथमच चिपळूणमध्ये येत आहेत. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर सोमवारी शरद पवार यांची सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना बोलावण्यात आले आहे. शरद पवार यांच्या दौऱ्यामुळे शहरात लावण्यात आलेल्या ‘मी येतोय...’ या फलकाची जोरदार चर्चा सध्या चिपळुणात सुरू आहे.

शरद पवार रविवारी (ता. २२) सायंकाळी चिपळूणमध्ये मुक्कामी येणार आहेत. या मुक्कामात ते महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

सोमवारी सकाळी ते चिपळूणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले शेखर निकम हे सध्या अजित पवारांच्या गोटात आहेत, त्यांच्याबाबत शरद पवार काय बोलणार, याकडेही चिपळूणचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT