Mahayuti Poster Controversy in Beed: आगामी काळात होत असलेली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने अनेक कल्याणकारी योजनेची घोषणा केली आहे. लोकसभा निववडणुकीत सपाटून मार खावा लागल्याने खडबडून जागी झालेल्या महायुती सरकारने येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हाती घेत महिलांना दीड हजार रुपये महिना मानधन सुरु केले. या योजनेच्या श्रेयावरुन सध्या महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे.
याबाबतचा वाद हा नुकताच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता. या योजनेच्या बॅनरवरून शिंदे गटाच्या नेत्यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाला लक्ष्य केले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटवला होता.
त्यानंतर आता बीडमध्ये विविध भागांत झळकत असलेल्या पोस्टरमध्ये तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच लाडक्या बहिणीचे मोठे भाऊ दिसत आहे. बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) टिकलीएवढा फोटो असून उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र, या पोस्टरवरुन गायब आहेत. त्यामुळे हे बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार ‘रिकव्हरी’चा प्रयत्न करत आहे. मात्र, योजनेच्या श्रेयवादावरुन तीन पक्षांत जुंपल्याचेही उदाहरणे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस एकटाच या योजनेचे श्रेय घेत असल्याचा वाद नुकताच मुंबई पातळीवरही रंगला होता.
आता बीडमध्ये काही ठिकाणी या योजनेबद्दल निनावी पोस्टर्स झळकले आहेत. यात देवेंद्र फडणवीसांच्या भल्यामोठ्या फोटोसह कमळाचे चिन्ह तसेच ‘देवा भाऊ’ #लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला’ असा मजकूर आहे.
या बॅनरवर वरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले तसेच अहिल्यादेवी होळकर यांचे फोटो आहेत. उजव्या बाजूला कोपऱ्यात याच आकाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो आहे. बॅनर लावणाऱ्यांनी आपले नाव गुपित ठेवले असले तरी बॅनर लावण्यामागे देवेंद्र फडणवीसांनाच ‘मोठा भाऊ’ करण्याचा उद्देश साफ दिसत आहे.
काही दिवसापूर्वी राज्य सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीत या योजनेच्या श्रेयावरून वाद रंगला होता. त्यावेळेस या योजनेच्या बॅनरवरून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी अजित पवार गटाला लक्ष्य केले होते.
त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटवला होता. त्यानंतर आता बीडमध्ये विविध भागांत भाजपच्या नेतेमंडळीकडून लावण्यात आलेल्या या पोस्टरवरून येत्या काळात श्रेयवाद रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.