Raigad Shivsena NCP Political Conflict; Ramdas Kadam, Bharat Gogawale And Sunil Tatkare Sarkarnama
कोकण

Bharat Gogawale : तटकरे-कदमांच्या वादात गोगावलेंचा मोठा गौप्यस्फोट; 'कदमांनी तटकरेंना खासदार केलं!'

Bharat Gogawale on Ramdas Kadam Sunil Tatkare : अजितदादांच्या विमान अपघातामागे सुनील तटकरे यांचा हात असल्याचा दावा रामदास कदम यांनी करून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे.

Aslam Shanedivan

Raigad News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या चौकशीची मागणी करणारे खळबळजनक वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले. कदम यांच्या या आरोपांनंतर सुनील तटकरे यांनी त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना तटकरे यांच्या खासदारकीचे श्रेय रामदास कदम यांना दिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपात की अपघात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपासून हा विषय शांत झाला असतानाच रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. या विमान अपघातामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तर नाहीत ना, असा संशय व्यक्त करत कदम यांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. तटकरेंना उपमुख्यमंत्री व्हायचे होते, असे आपल्या कानावर आल्याचा दावाही त्यांनी केला होता.

रामदास कदम यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर सुनील तटकरे यांनीही आक्रमक भूमिका घेत कदम यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, महाड येथे माध्यमांशी बोलताना पालकमंत्री भरत गोगावले यांनी या वादावर भाष्य केले. रामदास कदम हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. सुनील तटकरे यांना उमेदवारी द्यावी, यासाठी रामदास कदम यांनीच त्यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीही कदम यांनी घेतली होती. त्यानुसार तटकरे यांना निवडून आणण्यात आले, असा दावा गोगावले यांनी केला.

तटकरे आणि कदम यांच्यात नेमके काय घडले, याची आम्हालाही माहिती नाही, असे सांगत गोगावले यांनी दोन्ही पक्षांतील समन्वयावरही भाष्य केले. माझ्या मते, वरिष्ठ स्तरावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चांगला समन्वय असेल, तर तोच समन्वय खालच्या स्तरावरही असायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाची जुनीच ठिणगी

दरम्यान, रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष नवा नाही. पालकमंत्री पदावरून गेल्या दोन वर्षांत दोन्ही पक्षांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये दिलजमाई झाली आणि अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. मात्र, कोकणातील राजकीय संघर्ष अद्याप पूर्णपणे शमलेला नाही.

तटकरे आणि गोगावले यांच्यातील राजकीय मतभेदांबरोबरच रामदास कदम आणि आमदार थोरवे यांच्याशी संबंधित राजकीय मुद्द्यांमुळेही वादाला वेगवेगळे पैलू मिळत आहेत. त्यामुळे कोकणातील राजकीय वातावरण सातत्याने तापलेले दिसत आहे. एकीकडे तटकरे यांच्याविरोधात कदम यांनी केलेले गंभीर आरोप, तर दुसरीकडे तटकरे यांचा कायदेशीर नोटीस बजावण्याचा इशारा, यामुळे हा संघर्ष आता कोणते वळण घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT