Speaker Rahul Narwekar Viral video; Sanjay Raut sarkarnama
कोकण

Rahul Narwekar Video : राऊतविरुद्ध नार्वेकर वादाला नवा तडका, शेतकऱ्याचा स्फोटक खुलासा! आता राऊतही भडकले; म्हणाले, त्यांना राजीनामा...

Rahul Narwekar Vs Sanjay Raut : अलिबाग येथील म्हात्रोळी गावात जमिनीच्या वादातून हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले होते. यानंतर पुन्हा एकदा संजय राऊत यांनी पोस्ट डिवचले आहे.

Aslam Shanedivan

  1. अलिबागच्या म्हात्रोळी गावातील जमीन वादाच्या व्हायरल व्हिडीओवरून राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप करण्यात आले.

  2. खासदार संजय राऊत यांनी व्हिडीओ शेअर करत माहिती बाहेर आल्यास राजीनामा द्यावा लागेल असा इशारा दिला.

  3. नार्वेकर यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.

Alibag News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अलिबाग येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पोस्ट करत गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांनी, गावातील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठीच नार्वेकर तेथे गेले होते. ती जमीन एका गुजराती उद्योगपतीच्या फार्महाऊससाठी हवी होती, असा दावा केला होता.

यानंतर खुद्द ॲड राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण देताना, मी फक्त त्यांना शांतपणे वाद मिटवण्याचा सल्ला दिला आणि पुढे निघून गेलो. त्या वादाशी किंवा त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण माझे नाव त्या घटनेशी जोडू नये, असे आवाहन केले होते. यानंतर आता राऊत यांनी पुन्हा एकदा नार्वेकर यांना डिवचले असून ‘मी माहिती बाहेर काढली तर नार्वेकर यांना राजीनामा द्यावा लागेल’, असा मोठा इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा होत असून नार्वेकर अडचणीत आल्याची कुजबूज सुरू झाली आहे.

अलिबागमधील म्हात्रोळी गावात जमिनीच्या वादातून हाणामारी झाली होती. येथे शेतकरी दाम्पत्याने मोजणीसाठी गेलेल्या लोकांवर हाथ उचलत राडा केला होता. आता या हाणामारीच्या प्रकणाचा थेट संबंध नार्वेकर यांच्याशी लावला जात असून राऊत यांनी देखील याचा संबंध नार्वेकर यांच्याशी जोडत हल्लाबोल करत टीका केली होती. यानंतर राजकीय वातावरण तापल्यानंतर नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले होते.

ते म्हणाले की, व्हायरल व्हिडिओ संदर्भात मला सांगावे वाटतं की, मी माझ्या शेतजमिनीवर जात असताना रस्त्यावर दोन शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू होता. त्यावेळी मी फक्त त्यांना शांतपणे वाद मिटवण्याचा सल्ला दिला आणि पुढे निघून गेलो. पण आता विनाकारण माझे नाव त्या घटनेशी जोडले जात आहे. मात्र प्रत्यक्षात त्या घटनेशी किंवा वादाशी माझा कोणताही संबंध नाही असे म्हणत नार्वेकरांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

यानंतर आता हे प्रकरण शांत झाल्याचे दिसत असतानाच राऊत यांनी पुन्हा एकदा यावर मोठं भाष्य केलं आहे. ते म्हणाले, व्हिडीओ पाहिल्यानंतर कळतं की, नंतर दबाव वाढवून देवाणघेवाण झाली? कारण मी त्याचं गावातला आहे. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी. जर आणखी काही समोर आणलं तर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना राजीनामा द्यावा लागेल. आता एवढंच सांगतो, असे म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे.

तसेच पुढे राऊत म्हणाले की, माझा जन्म अलिबागचा असून माझ्याकडे जास्त माहिती आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे चेरमन जक्षय शाह आहेत. ते गुजरातचे असून त्यांनी अलिबागमध्ये अलिकडच्या काळात किती एकर जमीन खरेदी केली? आणि त्याची दलाली कोण करत होतं? संपूर्ण अलिबाग गुजरात लॉबीच्या ताब्यात देण्याची सूत्र कोण हलवत आहे? त्यामुळे मला तोंड उघडायला लावू नका. अमित शाह आणि जय शाह यांचा जक्षय शाह हा खास माणूस असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यासर्व प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले असतानाच म्हात्रोळी येथील संबंधीत शेतकऱ्याचा खुलासा समोर आला आहे. शेतकरी रमेश पाटील यांनी, नार्वेकर यांचा या प्रकरणी काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. त्यांनी, अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी येथील वादाच्या व्हायरल व्हिडोशी विधान सभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचा काहीही संबंध नाही. जमिन मापणी प्रकरणी वाद झाला त्या वेळी नार्वेकर तेथून जात होते. त्या दरम्यान त्यांनी हा वाद आपापसात मिटवून टाका असे समजावून सांगितल्याचेही शेतकरी रमेश पाटील यांनी सांगितले. तसेच पाटील यांनी, त्या व्हिडीओचा गैर वापर कोणी करू नये असे देखील आवाहन केले आहे.

FAQs :

1. वादाची सुरुवात कशामुळे झाली?
म्हात्रोळी गावातील जमीन वादाच्या व्हायरल व्हिडीओमुळे वाद सुरू झाला.

2. संजय राऊत यांनी काय इशारा दिला?
माहिती बाहेर काढल्यास राहुल नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल असे म्हटले.

3. राहुल नार्वेकरांची भूमिका काय आहे?
त्यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

4. हा व्हिडीओ कुठे शेअर करण्यात आला?
संजय राऊत यांनी तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला.

5. या प्रकरणाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
राजकीय चौकशीची मागणी आणि आरोप-प्रत्यारोप आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT