विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अलिबाग दौऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संजय राऊत यांनी गुजरात उद्योगपतींसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचा आरोप केला.
म्हात्रोळी गावातील जमीन प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण तापले.
संबंधित शेतकरी रमेश पाटील यांनी नार्वेकर यांचा या व्यवहाराशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
Raigad News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग मधील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोपांचा स्फोटक दावा करत आरोप केला होता. त्यांनी, म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते, ही एका गुजराती उद्योगपतीच्या फार्महाऊससाठी हवी होती, असा आरोप केला होता. पण आता म्हात्रोळी येथील शेतकरी रमेश पाटील यांनी मोठा खुलासा असून यामुळे राऊत यांच्या आरोपातील हवा गेली आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर फिरत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. तर हा व्हिडीओ जमिन मोजणी संदर्भात असल्याचे समोर येत आहे. तर या व्हिडीओत एक दाम्पत्य नार्वेकरांच्या सहकाऱ्यांवर आरोप करताना दिसत आहे.
आपण घरी नसताना आपल्या जमिनीची मोजणी कशी केली असा प्रश्न हे दाम्पत्य नार्वेकरांच्या सहकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत. तसेच नार्वेकर आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना येथील स्थानिक शेतकरी हाकलून लावत असल्याचं यात दिसत आहे. या सर्व प्रकारानंतर नार्वेकरांनी त्या ठिकाणाहून पाय काढता घेतल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे.
या सर्व प्रकारानंतर राऊत यांनी मोठा दावा करत गंभीर आरोप केले. त्यांनी, गुजरातच्या एका उद्योजकाला फार्म हाऊस बांधायचं आहे, म्हात्रोळीतील ती जागा त्याच्या नजरेत भरली. ती जागा त्याच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर सरकारी मोजणी अधिकारी घेऊन गेले. कुटुंबातील एक कार्यक्रम असल्याने, त्या जागेचे मालक बाहेरगावी गेले होते, ते घरी नव्हते. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सरकारी अधिकारी त्या ठिकाणी गेले आणि मोजणी सुरू केल्याचा आरोप राऊतांनी केलाय.
राऊत यांनी, त्या माऊलीने कुणाकुणाच्या कानफटीत मारलंय याचा पूर्ण व्हिडीओ समोर येईल. अधिकाऱ्यांना मारहाण झालीय. आमच्या जमिनी तुम्ही बळकावताय मग आम्ही शांत बसू का? असा जाब विचारल्याचे राऊत यांनी म्हटले होते. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये गुजरातच्या टोळधाडी भाजपचे पुढारी आणत आहेत. आता तर विधानसभा अध्यक्षच कोकणचं स्मशान करत आहेत. ते कोकणामध्ये गुजरात करत आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला.
त्या माऊलीचं आपण अभिनंदन करत असून तिने या सत्ताधाऱ्यांची लायकी काय आहे हे महाराष्ट्राला दाखवून दिलं. फडणवीस हे स्वतःला चौकीदार म्हणवतात आणि त्यांचे नेते शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावतात? पण एकीकडे नार्वेकर म्हणतात की, ते भांडण सोडवायला गेले. मात्र त्यांना भांडण सोडवायला कुणी बोलावलं? त्यांना आडवळणाला तुम्ही तिकडे का गेलात? असाही सवाल राऊत यांनी केला होता. यासर्व प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले असतानाच म्हात्रोळी येथील संबंधीत शेतकऱ्याचा खुलासा समोर आला आहे.
म्हात्रोळी येथील शेतकरी रमेश पाटील यांनी, नार्वेकर यांचा या प्रकरणी काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. त्यांनी, अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी येथील वादाच्या व्हायरल व्हिडोशी विधान सभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचा काहीही संबंध नाही. जमिन मापणी प्रकरणी वाद झाला त्या वेळी नार्वेकर तेथून जात होते. त्या दरम्यान त्यांनी हा वाद आपापसात मिटवून टाका असे समजावून सांगितल्याचेही शेतकरी रमेश पाटील यांनी सांगितले. तसेच पाटील यांनी, त्या व्हिडीओचा गैर वापर कोणी करू नये असे देखील आवाहन केले आहे.
1. वादाची सुरुवात कशामुळे झाली?
अलिबाग तालुक्यातील एका व्हिडीओच्या व्हायरल झाल्यानंतर हा वाद सुरू झाला.
2. संजय राऊत यांनी काय आरोप केला?
कोकणातील जमीन गुजरातच्या उद्योगपतींसाठी उपलब्ध करून दिल्याचा आरोप केला.
3. संबंधित गाव कोणते आहे?
म्हात्रोळी गावातील जमिनीबाबत हा आरोप करण्यात आला.
4. शेतकरी रमेश पाटील यांनी काय म्हटले?
नार्वेकर यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
5. या प्रकरणामुळे काय परिणाम झाले?
राज्यातील राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.