Jayant patil Sarkarnama
कोकण

आम्ही पाठीत खंजीर खुपसणारे नाही; तर समोरासमोर लढणारे

कोणताही राजकीय पक्ष सत्ताकाबीज करू शकत नाही

सरकारनामा ब्यूरो

खोपोली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीत शेकाप कोणाबरोबर आघाडी करणार, याचा निर्णय सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन योग्य वेळी घेतला जाईल. मात्र, रायगड जिल्ह्यात शेकापच केंद्रस्थानी असून, कोणताही राजकीय पक्ष सत्ताकाबीज करू शकत नाही, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस व आमदार जयंत पाटील यांनी केले. (Alliance decision only by taking the Activists into confidence : PWP's Jayant Patil's announcement)

खोपोलीत रविवारी (ता. १७) शेकापचा खालापूर तालुका व खोपोली शहर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला सरचिटणीस व विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, पनवेलचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, विलास थोरवे, गुरुनाथ मांजरेकर आदी वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन माजी आमदार धैर्यशील पाटील व आमदार जयंत पाटील यांनी केले.

आम्ही कधीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. लढतो ते समोरासमोर. कारण शेकापची शक्ती ही सामान्य माणूस आहे. दलित, वंचित व शेतकरी-कष्टकरी वर्गाचा आवाज शेकाप असल्याने आपली बांधिलकी त्यांच्याशी असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

आमदार जयंत पाटील यांनी विस्तृतपणे पक्षाची राजकीय वाटचाल व आगामी रणनीतीबाबत माहिती दिली. संपूर्ण रायगड जिल्ह्यात किंवा खोपोली-खालापूर तालुक्यात शेकाप कोणाबरोबर आघाडी करणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. स्वबळावर शेकाप पूर्ण ताकदीने आगामी निवडणुकीत उतरू शकतो. त्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी या मेळाव्यात केले. या वेळी पाटील यांनी भाजप व भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर सडकून टीका करून वर्तमान भाजप पक्ष हा पाट लावून आलेल्या उसन्या नेत्यांचा कोणतेही ध्येय धोरण नसलेला राजकीय पक्ष बनल्याचे सांगितले.

निवडणुकीत जय पराजय महत्त्वाचा नसून, शेकाप सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी कायम कटिबद्ध आहे आणि याही पुढे राहणार हे महत्त्वाचे आहे. विकास होत असताना येथील गरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा जीव जाणार नाही, यासाठी शेकाप कार्यरत राहील. गरज पडल्यास संघर्षही करेल, असा विश्वास धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केला.

खोपोली चिटणीस अविनाश तावडे, तालुका चिटणीस संदीप पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी संतोष जंगम, खालापूर नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्ष शिवानी जंगम यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकायांनी मेहनत घेतली. प्रास्ताविक, सूत्रसंचालन जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील यांनी केले. तर गुरुनाथ साठेलकर यांनी आभार मानले. खोपोली शहर व तालुक्यातील काही राजकीय कार्यकर्त्यांनी या वेळी शेकापमध्ये प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT