Aniket Tatkare Sunil Tatkare Meet Eknath Shinde sarkarnama
कोकण

Shivsena Politics : कोकणातील शिवसेना नेत्याच्या बैठकीत ट्विस्ट; आमदारांनी युतीधर्म पाळावा पण अर्ज मागे न घेण्याच्या एकनाथ शिंदेंच्या सूचना; तटकरेंची धडधड वाढली

MLC Election News : विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहवयास मिळत असून महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणात शिंदेंच्या शिवसेनेनं राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्याचे आता चित्र आहे.

Aslam Shanedivan

Mumbai news : राज्यात 17 जागांसाठी विधानपरिषद निवडणूक होत असून महायुतीतच जोरदार रस्सीखेच दिसत आहे. कोकणच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना आग्रही दिसत आहे. अशातच महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून त्यामध्ये भाजपला सर्वाधिक 11, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 आणि दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा सुटल्या आहेत. ज्यात कोकणची जागा आहे.

पण आता याच जागेवरून मोठा ट्विस्ट पाहवयास मिळत असून महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणातील शिवसेना नेत्याच्या बैठकीत आमदारांनी युतीधर्म पाळावा पण अर्ज मागे घेऊ नये अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचे आता समोर येत आहे. यामुळे शिंदेंचे आशीर्वाद मिळाल्यानंतर वाट मोकळी झाल्याचे वाटणाऱ्या अनिकेत तटकरे यांची धडधड वाढली आहे.

विधानपरिषद निवडणूक घोषित होताच रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग (कोकण) जागेवरून महायुतीत वादाची पहिली ठिणगी पडली होती. एकीकडे ही जागा राष्ट्रवादीला जाणार हे फिक्स असतानाच मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी दंड थोपाटले होते. यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील पालकमंत्री पदाच्या वादाची धार पुन्हा एकदा गडद झाली. यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पालकमंत्री पद शिवसेनेला सोडत आपल्या मुलासाठी ही जागा पदरात पाडून घेत सेटलमेंट केल्याची चर्चा सुरू झाली होती.

या चर्चा शांत होत असतानाच आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्येनं थेट अपक्ष अर्ज भरत तटकरेंना असहकाराची भूमिका घेतली तसेच आपला विरोध असेल असेही जाहीर केले. ज्यानंतर शिवसेनेची आणि दळवी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. पण त्यांनी देखील आपला तटकरेंना विरोध असणार असून पालकमंत्री पदासह ही जागा शिवसेनेची असताना सेटलमेंट कशासाठी असा सवाल उपस्थित केला होता. त्यातच उदय सामंत यांनी देखील रत्नागिरीतून आपल्या विश्वासूचे नाव पुढे केल्याने नवा पेच निर्माण झाला होता.

अशा या रंगत आलेल्या जागेवरून अधिक पेच निर्माण होण्याच्या आधीच खासदार तटकरे यांनी मुलासह शिंदेंची भेट घेतली. ज्यानंतर एक फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. ज्यात शिंदेंनी तटकरेंना आशीर्वाद दिल्याचे दिसत असून पाठीवर हात ठेवल्याचे दिसत आहे. या फोटोनंतरच अनिकेत तटकरेंचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरू झाली आणि सोमवारी अर्ज भरण्यासाठी अनिकेत तटकरे आणि बहिण आदिती तटकरेंसह निघाल्याच्या बातम्या धडकल्या.

याचदरम्यान गोगावले यांनी देखील आपला मुलगा विकास गोगावले याच्यासह शिंदेंची भेट घेतली. ज्यानंतर गोगावलेंचं पालकमंत्री होण्याचं स्वप्न लवकर पूर्ण होणार अशी चर्चा होऊ लागली. पण आता शिंदेंनी कोकणातील शिवसेना नेत्यांची घेतलेल्या बैठक आणि त्यांना दिलेल्या सूचनेमुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.

शिंदेंनी आपल्या नेत्यांना या बैठकीत आमदारांनी युतीधर्म पाळावा अशा सक्त ताकीद केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे जेथे मित्र पक्षांना जागा गेल्या आहेत तेथे शिवसेनेला पूर्ण ताकदीनीशी काम करावे लागेल असा संदेश नेत्यांसह कार्यकर्त्यांना गेला आहे. पण याच वेळी शिंदेंनी जे अर्ज भरले गेले आहेत. ते लगेच मागे न घेता ४ तारखेपर्यंत थांबण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशामुळे आता जुईली दळवी यांना लगेच माघर घ्यावी लागणार नाही किंवा विकास गोगावले देखील आपला निर्णय बदलू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता असून तटकरे कोणती भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT