Thane Crime News : कोकणातील विविध जिल्ह्यात खुनांच्या घटना घडताना दिसत असून काहीच दिवसांपूर्वी नवी मुंबईच्या विविध भागात तीन खुनांच्या घटना उघडकीस आल्या होत्या. यामुळे वाढत्या गुन्हेगारीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहविभागाच्या पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अशातच आता बदलापुरात रक्तरंजित थरार उघडकीस आला असून एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आता ही हत्या आहे की आत्महत्या, याचा तपास पोलीस करत आहेत.
नवी मुंबईत काहीच दिवसांपूर्वी अवघ्या 24 तासांत वेगवेगळ्या खुनांच्या तीन उघडकीस आल्या होत्या. आरटीआय कार्यकर्ता अमित मौर्य आणि बिल्डर संदीप गवस यांच्यावर झालेल्या गोळीबाराने नवी मुंबई हादरली होती. तर या जीवघेण्या हल्ल्यात पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या घटनेमुळे नवी मुंबईत एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान आता बदलापूरजवळ असलेल्या सागाव येथे एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. येथील फार्महाऊसमध्ये छातीत गोळी लागलेल्या अवस्थेत एका 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. भुवन कृष्णा पाटील असे या मृत तरुणाचं नाव असून त्याचे स्वतःचे क्रिकेटचा टर्फ असून येथेच त्याचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
कुळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूरपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सागाव येथे पाटील माऊंटन व्ह्यू फार्महाऊस आहे. हे येथे भुवन पाटील याचे क्रिकेट टर्फ आहे. याच क्रिकेट टर्फवर शनिवारी (ता.18) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भुवन पाटील जखमी अवस्थेत पडला. तर त्याला गोळी लागल्याचे समोर आले.
यानंतर नातेवाइकांनी याची माहिती पोलिसांना देत जखमी भुवनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत झाला होता. यावेळी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. प्राथमिक तपास करत पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासला ज्यात धक्कादायक माहिती समोर आली. ज्यामध्ये भुवन पाटील जखमी अवस्थेत बाहेर येताना दिसत असून त्याने त्याच्याकडील बंदूक बाहेर फेकल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करत नातेवाईकांचे जबाब नोंदवले. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करत पुढील तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. तसेच त्या बंदुकीचा परवाना होता की नाही, याचाही तपास पोलीस करत आहेत. तसेच ही हत्या होती की आत्महत्या या अनुषंगाने देखील पोलीस तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.