Raigad News : शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी कोकण दौरा करत मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था आणि रखडलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या पूल आणि त्यावेळी लागलेल्या बॅनरवरून रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी, ‘बॅनरची क्वालिटी ए-वन आहे आणि रस्त्याची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी आहे,’ असा घणाघात केला आहे. ते माणगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गेली १८ वर्षे होऊनही सदरचे काम आजही पूर्ण झालेले नाही. यावरून कोकणवासीयांकडून अनेकदा संताप व्यक्त करण्यात आला आहे. तसेच आंदोलनेदेखील करण्यात आली आहेत. पण अद्याप ही कामे झाली नसून, कोकणवासीयांच्या नशिबी खराब रस्ताच आहे. अशातच आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग पूर्ण करा, अशी मागणी नागरिकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती.
दरम्यान, आज (२६) रोजी आदित्य ठाकरे यांनी रायगड-रत्नागिरी दौऱ्यात वडखळजवळील डोवळी येथून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी, मुंबई-गोवा महामार्गाबाबत गेल्या दहा वर्षांपासून प्रत्येक गणेशोत्सवापूर्वी रस्ता पूर्ण होण्याची घोषणा केली जाते, मात्र प्रत्यक्षात फक्त डागडुजीच केली जाते, असा आरोप केला.
मंत्री पाहणी करतात, अधिकारी येतात; पण रस्त्याची अवस्था कायम तशीच राहते, अशी टीका करताना नुकतेच रायगडचे पालकमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्यावरही निशाणा साधला. ते पालकमंत्री झाले म्हणून याच पुलावर चांगले बॅनर लागलेत. पालकमंत्र्यांचे बॅनर ए-वन दर्जाचे आहेत; पण रस्ता करायला कोणती स्पेस टेक्नॉलॉजी वापरतात, हेच कळत नाही, असा घणाघाती हल्लाबोल त्यांनी केला.
जनतेकडून टोलचे हजारो कोटी रुपये ओरबाडायचे, जाहिरातींवर खोक्यांनी उधळपट्टी करायची आणि कोकणवासीयांना खड्ड्यांतून प्रवास करायला लावायचा, असा टोलादेखील रस्त्यावरील खड्डे, पुलांची खराब अवस्था आणि टनेलमध्ये साचलेल्या पाण्याचा मुद्दा उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
काही दिवसांपूर्वीच या पुलाचे उद्घाटन झाले होते. स्थानिकांनी याबाबत तक्रार केली तेव्हा प्रशासनाने याची चौकशी केली. त्यानंतर हा पूल पुन्हा बंद झालेला आहे. हा पूल मुंबई-गोवा महामार्गावर असून, नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडे आहे. या मार्गावर काही ठिकाणी खड्डे आहेत. पाणी इतकं साचलंय की त्यात मासेही आहेत. आठ दिवसांपूर्वीच या पुलाचे उद्घाटन झाले होते; पण आता ही अवस्था आहे. या पुलाच्या खालचा रस्ता पाहिला, तर परिस्थिती आणखी गंभीर असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.