भास्कर जाधव यांनी कोकणातील मेळाव्यात शिंदे आणि फडणवीसांवर टीका केली.
ब्राह्मण समाजावर केलेल्या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला.
माफी मागण्यास नकार देत त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली.
Mumbai Political News : विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. राज्यात आता आगामी स्थानिकचे वारे वाहू लागले आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईत कोकणातील चाकरमान्यांचा मेळावा घेवून गंभीर आरोप केले आहेत.
जाधव यांनी दादर भवन येथे गुहागर मतदारसंघातील राजकीय घडामोडींवरून तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. भास्कर जाधव यांनी याच मेळाव्यात ब्राह्मण समाजावरही टीका करताना ब्राह्मण समाज पाताळी यंत्री असल्याचा आरोप करत, समाजात तेढ निर्माण करणारा अनाजीपंत असे म्हटल्याने नवा वाद सुरू झाला आहे.
यामुळे भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्यावर टीका केली जातेय. दरम्यान भास्कर जाधव यांनी यावरून स्पष्टीकरण देताना माफी मागायचा प्रश्नच येत नाही, असे म्हटले आहे. यामुळे भाजप-शिवसेना आणि ब्राह्मण समाज आता भास्कर जाधव असा संघर्ष पाहायला मिळत आहे.
भास्कर जाधव यांनी गुहागर मतदारसंघातील राजकीय घडामोडींवर स्थानिक नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करताना ब्राह्मण समाजाला टार्गेट केले होते. त्यांनी रामदास कदम यांचे नाव घेत आपल्याला निवडणुक कालावधीत अटक करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.
तत्कालिन जिल्हा पोलिस प्रमुखांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून माझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासह मला जेलमध्ये टाकण्याच्या आदेश दिला होता, असा गौप्यस्फोटही भास्कर जाधव यांनी केला.
प्रचारावेळी जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यावेळी गुहागर मतदारसंघातील ब्राह्मण समाजही माझ्याविरोधात गेला. त्यामुळे गुहागरमधील ब्राह्मण समाज पाताळी यंत्री असून समाजात तेढ निर्माण करणारा अनाजीपंत असल्याचा आरोप देखील जाधव यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी कुणबी समाजाला "सावध व्हा, हा शेवटचा वार आहे. मी बाजूला झालो तर तुम्हाला घेऊन टाकतील" असा इशाराही त्यांनी दिला.
त्यावेळी जर एसपींनी मंत्री आणि नेत्यांचे ऐकले असते तर मी आत असतो. पण एसपींनी "ज्या दिवशी एवढा जरी पुरावा सापडला तर मी अटक करेन पण एवढाही पुरावा सापडला नाही". त्यावेळी छोटे-छोटे समाज एकवटले.
मराठ्यांनी मनावर घेतले, असेही ते म्हणाले. या त्यांच्या वक्तव्यानंतर आता राज्यात नव्या वादाला तोंड फुटले असून भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ब्राह्मण समाजाकडून भास्कर जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहेत.
दरम्यान आता या वादावर भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिले असून आपल्या भाषणाचा रोख हा गुहागरमधील ब्राह्मण समाजावरच होता असे स्पष्ट केले आहे. त्यांनी, माझ्या भाषणाचा रोख हा ब्राह्मण समाजावरच होता, हे मी मान्य करतो. ते नाकारण्याचे कारण नाही. तसेच माफीही मागायचा प्रश्नच येत नाही, असे म्हणताना त्यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.
पक्षाच्या वतीने पत्र देण्याऐवजी ब्राह्मण समाज म्हणून पत्र का दिले? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. तर मी सुद्धा मराठा समाजात जन्माला आलो असून माझ्या समाजाचाही स्वाभिमान आहे.
माझ्याही मराठा समाजाला मान सन्मान आहे. त्यामुळे समाजात द्वेष पसरवण्याचे काम गुहागर तालुक्यातल्या ब्राह्मण समाजानं केलं असून तसे पत्र त्यांनी काढल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी यावेळी केला आहे.
प्र.१: भास्कर जाधवांनी नेमके काय वक्तव्य केले?
उ: त्यांनी ब्राह्मण समाजावर पाताळी यंत्री असल्याचा आरोप केला आणि समाजात तेढ निर्माण करणारा अनाजीपंत असे म्हटले.
प्र.२: यावर राजकीय पक्षांची प्रतिक्रिया काय आहे?
उ: भाजप आणि शिंदे गट यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि माफीची मागणी केली.
प्र.३: भास्कर जाधवांनी माफी मागितली का?
उ: नाही, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की माफी मागायचा प्रश्नच येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.