
Bhaskar Jadhav : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील आमदार भास्कर जाधव यांनी ठेवलेलं व्हाट्सअप स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. गुहागर विधानसभा मतदार संघातील ब्राम्हण सहाय्यक संघासोबत पेटलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्टेटस ठेवल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी ठेवलेल्या स्टेट्समुळे ब्राह्मण महासंघ आणि भास्कर जाधव यांच्यातील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भास्कर जाधव यांनी व्हॉटसअॅप स्टेटसला एक गाणे ठेवले आहे. 'भिडा किती, तुम्ही नडा किती, द्या द्यायचा तेवढा त्रास... कितीबी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास', असा आशयाचे हे गाणे आहे. या स्टेटसच्या माध्यमातून भास्कर जाधवांनी ब्राह्मण संघाला इशारा देत दंड थोपटले आहेत. यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मी एखादे राजकीय वाक्य बोललो, तर त्याचा संबंध संपूर्ण ब्राह्मण समाजाशी जोडणे योग्य नाही असं जाधवांनी म्हटलं होतं. तर ब्राह्मण महासंघानेही भास्कर जाधव यांच्यावर टीका केली होती. भास्कर जाधव हे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्यातील ऐक्याला बाधा आणत आहेत. त्यांनी राजकीय प्रवासात ब्राह्मण समाजातील अनेक उंबरठे आणि ओट्या झिजवल्याची आठवणही ब्राह्मण महासंघाने करुन दिली होती.
नेमकं काय आहे प्रकरण?
गुहागरच्या हेदवतड येथे झालेल्या सभेत भास्कर जाधव यांनी भाजपचे माजी आमदार स्वर्गीय तात्यासाहेब नातू यांचा संदर्भ घेतला. 1975 पासूनचा आपला राजकीय प्रवास मांडताना, त्या काळातील गुहागरचे भाजप आमदार तात्यासाहेब नातू यांच्या निवडणुकीत प्रचारासाठी स्वतःने सक्रिय भूमिका बजावल्याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. तसेच, गुहागरच्या इतिहासात पहिल्यांदा पंचायत समिती सभापतीपदी ब्राह्मण समाजातील व्यक्तीची नियुक्ती झाल्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय, त्यांनी गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनशाम जोशी यांना एक जाहीर पत्रही लिहिले होते.
या पत्राद्वारे भास्कर जाधव यांनी घनशाम जोशी यांच्यावर जोरदार टीका केली. “इतिहासाचे पुनरावलोकन मी नक्की करतो, मात्र त्यात रमणारा कार्यकर्ता नाही. मी फायद्यासाठी पक्ष बदलला? पण तुम्ही युतीत राहून गद्दारी करणारे गद्दार आहात,” असे त्यांनी पत्रात नमूद केले. ते पुढे म्हणाले, “माझे मित्र विनूभाऊ मुळे यांचा आपण उल्लेख केला आहे. त्यांच्या पत्नीला मी दोन वेळा गुहागर पंचायत समितीच्या सभापदी केले. गुहागर तालुक्यात ब्राह्मण समाजातील व्यक्तीला प्रथमच सभापती पद मिळवून देण्याचा मान माझ्या वाट्याला आला. याबद्दल एक कौतुकाचे पत्र पाठवण्याचीही तुम्हाला लाज वाटली असावी.
प्रवीण ओक यांचाही आपण उल्लेख केला. प्रवीण ओक आणि त्यांची पत्नी पूर्वा ओक या दोघांनाही मी दोन वेळा जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणले. तसेच, श्रीमती गीता खरे यांना नगरपंचायतीत निवडून आणून सभापदी केले, हे तुम्ही सोयीस्करपणे विसरलात. त्यामुळे, एखाद्या राजकीय सभेत मी म्हटलेले वाक्य संपूर्ण समाजाशी जोडणे, हे तुमच्यासारखे पाताळयंत्रीच करू शकतात,” असे जाधव यांनी म्हटले.
“मी राजकारणात आहे म्हणजे निवडणुका जिंकणे हेच माझे कर्तव्य मानतो, मी काही आश्रमशाळा चालवत नाही. 2007 साली मी गुहागरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. भोळ्या जनतेचे दुःख आणि त्रास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. लेखणीचा दहशतवाद अनुभवला. या जाचातून मुक्त होण्यासाठी लोक एका आश्वासक नेतृत्वाची वाट पाहत होते आणि माझ्या रूपात त्यांनी ते पाहिले — ही का माझी चूक? काम आणि जनसंपर्कातून मला पराभूत करता येत नाही, म्हणून आपल्यासारख्या अनेकांनी मला बदनाम करण्यासाठी वारंवार षडयंत्र रचले. जाती-पातीचे विष या तालुक्यात पसरविण्याचे काम करण्यात आले,” असे भास्कर जाधव यांनी पत्रात नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.