Raigad News : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात टोरंट पॉवरच्या साई डोंगर जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी सुरू असलेल्या कथित वृक्षतोडीचा मुद्दा आता राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ आणि विविध राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी महायुतीतील भाजपमधील नेत्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील नेत्यांकडूनही वृक्षतोडीबाबत आक्षेप घेतले जात असल्याचे चित्र आहे.
काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे हा मुद्दा केवळ विरोधकांपुरता मर्यादित न राहता सत्ताधारी पक्षांमधील नेत्यांपर्यंत पोहोचला आहे.
टोरंट पॉवरच्या प्रस्तावित वीज प्रकल्पासाठी भीमाशंकरच्या संवेदनशील जंगल परिसरात वृक्षतोड होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष आणि विविध पर्यावरणवादी संघटनांनी विरोध केला आहे. मनसे आणि ठाकरे गटाने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
सोमवारी (ता. २६) आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी वृक्षतोड झालेल्या परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी वृक्षतोडीवरून सरकारला जाब विचारला. तर बुधवारी (ता. २८) मनसे अध्यक्ष राज ठाकरे कर्जत येथे सभा घेणार आहेत. या सभेत ते सरकारवर काय टीका करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंगलातील वृक्षतोड थांबवण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वृक्षतोड थांबली असली तरी प्रकल्पाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी वनमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही या वृक्षतोडीला विरोध दर्शवला होता.
त्यांनी, आवश्यक नसताना वृक्षतोड करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यामुळे या प्रकल्पाच्या मुद्द्यावरून भाजपमध्येही मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही विरोधाची भूमिका घेतल्याने या वादाला नवे राजकीय वळण मिळाले आहे.
एका बाजूला आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक जंगल परिसरात दाखल झाले आणि त्यांनी सरकारविरोधात आंदोलन करत आंदोलकांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनीदेखील सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले.
दुसरीकडे, खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही वृक्षतोडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही वृक्षतोड दुर्दैवी असून ती तातडीने थांबवली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. एक झाड मोठे होण्यासाठी १५० ते २५० वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे सांगत निसर्गाची हानी केल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात, याचा अनुभव आपण आज घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुती सरकारला स्वपक्षीय खासदाराकडूनच पर्यावरणाच्या मुद्द्यावरून घरचा आहेर मिळाल्याची चर्चा रंगली आहे.
एखाद्या प्रकल्पासाठी झाड तोडणे अपरिहार्य असेल, तर एका झाडाच्या बदल्यात १०० झाडे लावून ती काही वर्षे जगवण्याची जबाबदारीही निश्चित केली पाहिजे, अशी अपेक्षाही ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली. सध्या निसर्गातील बदलांचा फटका शेतकऱ्यांना बसत असताना वृक्षतोड रोखण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, असे आवाहनही त्यांनी केले. भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीचा मुद्दा आता पर्यावरणापुरता मर्यादित न राहता महायुतीतील राजकीय मतभेदांचाही विषय बनत आहे. त्यामुळे सरकार या प्रकरणी पुढे कोणती भूमिका घेते आणि प्रस्तावित प्रकल्पाबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.