Verbal spat between Satish Sawant and Pradnya Dhavan

 

Sarkarnama

कोकण

मतदानादिवशीच जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत अडचणीत

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे. या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष व महाविकास आघाडीच्या पॅनेलचे प्रमुख सतीश सावंत आणि भाजप (BJP) उमेदवार प्रज्ञा ढवण यांच्यात बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेत सावंत यांना अडचणीत आणले आहे.

सतीश सावंत यांना अटक करावी, या मागणीसाठी भाजप नेत्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. सावंत यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, प्रज्ञा ढवण आणि भाजपच्या इतर महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. याचबरोबर त्यांना धमकीही दिली. त्यामुळे त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी भाजपने देवगड पोलिसांकडे केली आहे. याबाबतचे निवदेन देवगड तालुका भाजप महिला मोर्चा, देवगड तालुका भाजपने दिली आहे. भाजपने मतदानादिवशीच सावंत यांना अडतणीत आणल्याचे मानले जात आहे.

या निवडणुकीत नारायण राणेंच्या (Narayan Rane) पॅनेलसमोर महाविकास आघाडीचे पॅनेल आहे. तहसील कार्यालयात सतीश सावंत आणि प्रज्ञा ढवण आज समोरासमोर आले. त्यावेळी सावंत आणि ढवण यांच्यात जोरदार शिवीगाळ झाली. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच दोघांमध्ये जोरदार जुंपली होती. ढवण यांनी शिव्या दिल्यानंतर सावंत यांनी त्यांना दात पाडण्याची धमकी दिली. या वेळी ढवण यांची कन्या व जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत याही उपस्थित होत्या. पोलिसांनी अखेर मध्यस्थी करीत दोघांना बाजूला नेऊन हा वाद मिटवला.

भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर सोळा कोटीं रुपयांचे थकीत कर्ज आहे, त्यामुळे सहकार विभागाने त्यांचा मतदानाचा अधिकार नाकारला आहे. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय होणार आहे. त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर दुसरीकडे आज या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होत आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवलीच्या ओम गणेश बंगल्यावर मुक्काम ठोकला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पॅनेलसमोर महाविकास आघाडीने (Maha vikas Aghadi) आव्हान उभे केले आहे. तर कुणीही कितीही प्रयत्न केला तरी या निवडणुकीत आपलेच पॅनेल विजयी होणार, असा विश्वास राणे गटाला आहे. तर मेडिकल कॉलेज आणि मोटारींसाठी घेतलेले कर्ज बुडवण्यासाठी राणे यांना बँकेवर ताबा हवा असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आज सकाळपासूनच नारायण राणे यांच्या ओमगणेश बंगल्यात हालचालींना वेग आला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक पदाधिकारी नारायण राणे यांच्या बंगल्यावर उपस्थित आहेत. या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागले आहे. या संघर्षात कोण बाजी मारते त्याचा निर्णय 31 डिसेंबरला होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT