BJP Election Strategy in Ratnagiri : कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आणि मंत्र्यांचे दौरे वाढले आहेत. त्यामागे केवळ शासकीय कार्यक्रम नसून आगामी निवडणुकांची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. रायगड आणि रत्नागिरीतील सलग दौरे, कार्यकर्ता मेळावे आणि भाजप नेत्यांची वक्तव्ये पाहता, शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने स्वतंत्र राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळत आहेत.
शनिवारी रायगडमध्ये आणि रविवारी रत्नागिरीत 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर' आयोजित करण्यात आले. या शासकीय कार्यक्रमानंतर दोन्ही जिल्ह्यांत भाजपने स्वतंत्र कार्यकर्ता मेळावे घेत पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला. त्यामुळे शासकीय कार्यक्रमांच्या माध्यमातूनच निवडणुकीपूर्व वातावरणनिर्मिती सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
रत्नागिरीतील कार्यकर्ता मेळाव्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती सरकारच्या कामगिरीचा गौरव करत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. "कार्यकर्त्यांच्या निष्ठेमुळे महाराष्ट्रात महायुतीचे भक्कम सरकार सत्तेत आले असून, जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे," असे ते म्हणाले. महिलांसाठी आणि ग्रामीण भागासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देतानाच त्यांनी कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न गोळा करावेत, सरकार ते सोडवेल, असे आश्वासन दिले.
याच मेळाव्यात दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या कामाचे बावनकुळे यांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली कोकणात भाजप अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मनसेतून भाजपमध्ये आलेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी महत्त्वाचे राजकीय संकेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कोकणावर विशेष लक्ष असून, त्यामुळेच भाजपचे अनेक मंत्री सातत्याने कोकण दौरे करत आहेत. कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम सुरू असून, भविष्यात कोकणातील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होतील, अशी परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत प्रवीण दरेकर, आशीष शेलार यांच्यासह अनेक भाजप नेत्यांचे रत्नागिरी दौरे झाले. त्यानंतर बावनकुळे यांचाही दौरा झाला. या सलग दौऱ्यांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणात भाजप अधिक जागांवर दावा करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, हा सारा राजकीय संदेश उदय सामंत यांच्या प्रभावक्षेत्रात दिला जात असल्याने महायुतीतील आगामी जागावाटप आणि राजकीय समीकरणांच्या दृष्टीने या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शासकीय कार्यक्रमांच्या आडून भाजपने कोकणातील निवडणुकीची पेरणी सुरू केल्याची चर्चा आता अधिक जोर धरू लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.