Kirit Somaiya in Korlai
Kirit Somaiya in Korlai Sarkarnama
कोकण

प्रचंड बंदोबस्तात सोमय्यांनी कोर्लई गाव गाठलं पण त्या जागेकडे फिरकलेच नाहीत!

सरकारनामा ब्युरो

अलिबाग : मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मनीषा वायकर यांच्या नावावर असलेल्या जागेवरून राजकारण तापले आहे. या जागेवर 19 बंगले असल्याचा आरोप भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. यावर कोर्लईच्या सरपंचानी या जागेवर एकही बंगला नसून, गावात येऊन पाहणी करण्याचे आव्हान त्यांनी दिले होते. हे आव्हान स्वीकारून सोमय्या थेट कोर्लई गावात पोचले पण त्या जागेकडे फिरकलेच नाहीत. यामुळे गावात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सोमय्या आज कोर्लई गावात जाणार असल्याने पोलिसांनी मोठी तयारी केली होती. सोमय्या येणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. सोमय्यांना विरोध करणार नाही, हे शिवसैनिकांनी जाहीर केले होते. मात्र, मुंबईहून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन सोमय्या कोर्लई गावात पोचले. भाजपचा झेंडा घेतलेले कार्यकर्ते आल्याने शिवसैनिक संतापले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

सोमय्या हे पोलिसांच्या गराड्यात ग्रामंपचायतीच्या कार्यालयात गेले. तिथे सरपंच आणि ग्रामसेवकांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी कोणत्याही कागदपत्रांची मागणी त्यांनी केली नाही. त्यांनी केवळ एक पत्र ग्रामपंचायतीला दिले. यानंतर ते पोलीस बंदोबस्तात अलिबागकडे रवाना झाले. तेथे ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे समजते. कोर्लर्ई गावात सोमय्या गेले पण त्यांनी वादग्रस्त जागेकडे फिरकणे टाळले. दरम्यान, सोमय्या यांनी याआधी एकदा गावात येऊन त्या जागेची पाहणी केली होती, असे समजते.

सोमय्या यांनी मनीषा वायकर आणि रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या कोलेई गावात 19 बंगले असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. या जागेवर बंगले दिसले तर राजकारण सोडेन, असे खुले आव्हान राऊत यांनी सोमय्यांना दिले होते. नंतर या वादात कोर्लई गावच्या सरपंचानेच उडी घेतली होती. सोमय्यांचे सगळे आरोप त्यांनी खोडून काढले होते. कोर्लई ग्रामपंचायतीच्या हद्दीत मनीषा वायकर आणि रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या जागेवर 19 बंगले नाहीत. भाजप नेते किरीट सोमय्या करत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असा खुलासा कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT